‘आरपीएफ’कडून दोन चोरट्या टोळ्यांचा पर्दाफाश
‘आरपीएफ’कडून दोन चोरट्या टोळ्यांचा पर्दाफाश
मध्य रेल्वेच्या घाट विभागात कारवाई; सोन्याचे दागिने, मोबाईलसह मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई विभागातील इगतपुरी-कसारा घाट परिसरात आणि सोलापूर मार्गावर प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांविरुद्ध मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) मोठी कारवाई केली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या (जीआरपी) समन्वयाने करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये चोरट्यांच्या टोळ्यांचा पर्दाफाश करत चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
इगतपुरी-कसारा घाट विभागात प्रवाशांच्या सामान चोरीच्या तक्रारी वाढत असल्याने आरपीएफने विशेष मोहीम हाती घेतली होती. कसारा आणि इगतपुरी येथील आरपीएफ कर्मचारी, गुन्हे प्रतिबंधक व शोधपथक (सीपीडीएस) तसेच ‘जीआरपी’ इगतपुरी यांचे संयुक्त पथक तयार करून घाट परिसर आणि डोंगराळ भागात संशयितांवर गुप्त पाळत ठेवण्यात आली, यादरम्यान १२ जानेवारीला पाळत ठेवताना पथकाला संशयास्पद हालचाल दिसून आली. ट्रेन क्रमांक १२६१८ अप एर्नाकुलम-हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाचे सामान चोरणाऱ्या दोघांना आरपीएफने रंगेहाथ पकडले. आरोपींकडून मंगळसूत्रासह इतर सोन्याचे दागिने आणि सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींची चौकशी सुरू असून या प्रकरणातून प्रवाशांच्या सामान चोरीचे आणखी पाच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जीआरपी इगतपुरीकडून सुरू आहे.
एकाच ट्रेनमध्ये १.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
ट्रेन क्रमांक २०९१९ चेन्नई- एकतानगर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्येही आरपीएफने कारवाई करत चोरीचा मोठा मुद्देमाल जप्त केला. १७ जानेवारीला या गाडीत कर्तव्यावर एक सहाय्यक उपनिरीक्षक, चार आरपीएफ कर्मचारी आणि दोन जीआरपी कर्मचारी तैनात होते. पहाटे ५.३०च्या सुमारास गाडी दुधनी स्थानकात थांबली असताना एक संशयित व्यक्ती आरक्षित डब्यातून जनरल डब्याकडे धावताना दिसली. संशय आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तीन मोबाईल फोन आणि ५,१०० रुपयांची रोकड चोरल्याची कबुली दिली. तपासणीदरम्यान त्याच्याकडून सुमारे एक लाख ५२ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, मनगटी घड्याळ, पॉवर बँक, चार्जर आणि इयरफोन असा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

