मुंबईबाहेरील रक्तदान शिबिरांना ब्रेक
मुंबईबाहेरील रक्तदान शिबिरांना ब्रेक
वाहन परवानगीचे नवे नियम रद्द करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत मुंबईबाहेर आयोजित करण्यात येणारी रक्तदान शिबिरे नव्या वाहन परवानगी प्रक्रियेमुळे रद्द होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या पूर्वपरवानगीची अट बंधनकारक केल्यामुळे अनेक नियोजित शिबिरांवर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की पुढील किमान तीन वर्षांसाठी याबाबतची तरतूद केली जात आहे, एकदाच मान्यता मिळाल्यास वारंवार १०० ते १५० फाईल जमा करण्याची गरज भासणार नाही आणि यासाठी लागणारा वेळही वाचेल.
महापालिकेच्या रुग्णालयांतील रक्तपेढ्यांकडून मुंबई तसेच मुंबईबाहेरील भागांत नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. पूर्वी संबंधित रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या स्वाक्षरीने वाहन मंजूर केले जात होते; मात्र अलीकडे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, मुंबईबाहेर वाहन पाठवण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे विलंब होत असल्याने केईएम रुग्णालयाचे पनवेल येथे नियोजित शिबिर रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली. तसेच नायगाव, मिरा-भाईंदर आणि भिवंडी येथील शिबिरेही परवानगीअभावी रद्द झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या तीन शिबिरांतून सुमारे ४०० ते ५०० रक्तपिशव्या संकलित झाल्या असत्या, अशी माहिती नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली. पडवळ प्रशासनाचा हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, रक्तासारख्या जीवनावश्यक सेवेत प्रशासकीय अडथळे येणे अत्यंत गंभीर आहे. वाहन परवानगीसाठी इतकी किचकट प्रक्रिया असल्यास शिबिरे रद्द होणे अपरिहार्य ठरते, यासंदर्भात आयुक्तांकडे लेखी निवेदनही दिल्याचे त्यांनी सांगितले. नव्या निर्देशांनुसार, ज्यांना अधिकृतपणे वाहन अनुज्ञेय आहे, त्यांच्याशिवाय इतर कोणालाही महापालिकेच्या गॅरेजमधून वाहन उपलब्ध करून दिले जाणार नाही. विशिष्ट कार्यक्रम किंवा मोहिमांसाठी वाहन आवश्यक असल्यास संबंधित अतिरिक्त आयुक्तांची मान्यता आणि आर्थिक तरतुदीचा तपशील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रक्तदानासारख्या अत्यावश्यक सेवेत प्रशासकीय प्रक्रियेचा अडथळा ठरू नये, रुग्णांना वेळेवर रक्त मिळाले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे पूर्वीप्रमाणे अधिष्ठात्यांच्या स्वाक्षरीने वाहन परवानगी देण्याचा निर्णय घ्यावा.
- सचिन पडवळ, नगरसेवक
२०१२चा नियम, आता अंमलबजावणी का?
वाहन परवानगीसंदर्भात २०२२ पूर्वी परिपत्रक काढण्यात आले होते. तरीही अधिष्ठात्यांच्या स्वाक्षरीने मुंबईबाहेरील रक्तदान शिबिरांसाठी वाहने पाठवली जात होती. अचानक २०१२ मधील नियमाची कडक अंमलबजावणी २०२६ मध्ये का करण्यात आली, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

