मुंबईतील प्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ रडारवर

मुंबईतील प्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ रडारवर

Published on

मुंबईतील प्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ रडारवर
प्रकल्प ‘मानस’साठी १५९ कोटींची भरीव तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेच्या गुणवत्तेवर सूक्ष्म लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प ‘मानस’ (मुंबई एअर नेटवर्क फॉर ॲडव्हान्स सायन्स)वर पालिकेने जोर दिला आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पर्यावरण व वातावरणीय बदल खात्यासाठी १५९.८२ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे.

​मुंबईत नेमक्या कोणत्या भागात आणि कोणत्या कारणामुळे प्रदूषण वाढते आहे, हे शोधण्यासाठी पालिकेने आयआयटी (आयआयटी) कानपूरच्या मदतीने प्रकल्प ‘मानस’ हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण मुंबईत ७५ कमी खर्चाच्या सेन्सर्सचे जाळे उभारले जात आहे. या सेन्सर्समुळे प्रत्येक गल्ली-बोळातील हवेच्या गुणवत्तेचे सूक्ष्म निरीक्षण करणे शक्य होणार आहे. आयआयटी कानपूरच्या मूल्यांकन अहवालाच्या आधारे पालिका प्रदूषणाविरुद्ध ठोस धोरण आखणार आहे.

​मुंबई हे जगभरातील अशा १३ आंतरराष्ट्रीय शहरांपैकी एक आहे, जे सी-४० सिटीजच्या वातावरणीय अर्थसंकल्प कार्यक्रमात सहभागी झाले आहे. पालिकेने २०२५-२६ च्या एकूण भांडवली खर्चाच्या सुमारे ३७ टक्के हिस्सा पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी राखून ठेवला आहे. २०५० पर्यंत मुंबईला ‘नेट-झीरो’ शहर बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
---
प्रत्यक्ष कृतीवर भर
देखरेखच नाही, तर प्रत्यक्ष कृतीवरही पालिकेने भर दिला आहे. हवेतील सूक्ष्म धूलिकण (पीएम २. ५ आणि पीएम १०) टिपण्यासाठी लिटर-पिकर मशिनसह इलेक्ट्रिक स्वीपर आणि यांत्रिकी पॉवर स्वीपर तैनात करण्यात आले आहेत. रस्ते धुण्यासाठी पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याचा वापर आणि प्रत्येक विभागात मिस्टिंग मशीन व स्प्रिंकलर्सचा वापर केला जात आहे. बांधकाम स्थळांवर प्रदूषणाबाबतच्या २८ कलमी मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
----
​हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १५९.८२ कोटी
​हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने निधीमध्ये मोठी वाढ केली आहे ​२०२५-२६ (सुधारित अंदाज) ७६.१६ कोटी रुपये, तर ​२०२६-२७ (प्रस्तावित तरतूद)१५९.८२ कोटी रुपये अशी आहे.​ या भरीव तरतुदीमुळे मुंबईच्या हवेचा दर्जा सुधारण्यास आणि नागरिकांना शुद्ध हवा मिळण्यास मदत होणार आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com