अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणावर भर
अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणावर भर
अत्याधुनिक वाहने, नवीन केंद्रांसाठी २३० कोटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईतील वाढत्या उत्तुंग इमारती आणि नागरी विस्तार लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाचा चेहरामोहरा बदलण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उंच शिड्यांची वाहने आणि नवीन अग्निशमन केंद्रांच्या माध्यमातून आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम करण्यावर पालिकेने भर दिला आहे. या सक्षमीकरणासाठी २०२६-२७च्या अर्थसंकल्पात २३०.९० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
शहरातील अति उंच इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच उच्च इमारत अग्निशमन वाहने खरेदी करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये ३२ मीटर आणि ४० मीटर उंचीची प्रत्येकी एक टर्न टेबल शिडी ताफ्यात दाखल झाली असून, २४ मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म असलेली चार प्रथम प्रतिसाद वाहने लवकरच कार्यान्वित होतील. २५० मीटर उंचीपर्यंत पाणी फवारू शकणारी ११ अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना ड्रोन आणि कॉम्प्रेस्ड एअर फोम प्रणालीचा समावेश केला जाणार आहे.
नवीन अग्निशमन केंद्रांचे जाळे
- कांजूरमार्ग (एलबीएस मार्ग) केंद्राचे काम अंतिम टप्प्यात
- कोस्टल रोड (दक्षिण) परिसरात नवीन केंद्र उभारले जाणार आहे.
- सांताक्रूझ (जुहू तारा रोड), चेंबूर (माहूल रोड) आणि टिळकनगर येथे नवीन केंद्रांचे नियाेजन
-----
बचावकार्याचे प्रशिक्षण
अग्निशमन दलाच्या जवानांना मर्यादित जागेत बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सिम्युलेटर एप्रिल २०२६पर्यंत कार्यान्वित होणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी २०२५-२६मध्ये १११.६८ कोटी आणि पुढील वर्षासाठी २३०.९० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
....
खर्च आणि साधनसामग्रीचा तपशील
- अत्याधुनिक ११ अग्निशमन वाहने (२५० मीटर क्षमता) निविदा स्तरावर
- टर्न टेबल शिडी व हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म ६ वाहने
- नवीन सहा अग्निशमन केंद्रे
-----
२०२५-२६ची तरतूद १११.६८ कोटी
२०२६-२७ची प्रस्तावित तरतूद २३०.९० कोटी
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

