‘बेस्ट’चा भूखंड विकसकाच्या घशात?
‘बेस्ट’चा भूखंड विकसकाच्या घशात?
मलबार हिलमधील आरक्षण बदलाच्या हालचालीचा आराेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मलबार हिलसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या मालकीच्या मौल्यवान भूखंडाचे आरक्षण बदलून तो रहिवासी क्षेत्रात (आर झोन) समाविष्ट करण्याच्या महापालिकेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाचा हा निर्णय बेकायदा आणि सार्वजनिक हिताविरोधात असल्याचा दावा करून बेस्ट जागृत कामगार संघटनेने यावर लेखी हरकती नोंदवल्या आहेत. हा भूखंड खासगी फायद्यासाठी वापरण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
मलबार हिल येथील न. भू. क्र. १बी/६६९ या २४७५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर विकास आराखडा २०३४नुसार विद्युत प्रेषण व वितरण सुविधा आणि बेस्ट बससेवा असे आरक्षण आहे. पालिकेने हे आरक्षण रद्द करून ही जागा निवासी वापरासाठी खुली करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावामुळे येथील वीज संग्राही केंद्र आणि कर्मचारी वसाहतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
संघटनेचे सरचिटणीस सुहास नलावडे यांच्या हरकतीनुसार, या जागेवर महत्त्वाचे वीज संग्राही केंद्र असून तेथून वाळकेश्वर ते वरळी परिसरातील वीजपुरवठ्याचे नियंत्रण केले जाते. हे आरक्षण हटवल्यास या भागातील रुग्णालये, गृहनिर्माण संस्था आणि अत्यावश्यक सेवांच्या वीजपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच शासकीय गुपिते अधिनियम १९२३नुसार अशा संवेदनशील ठिकाणी खासगी संस्थांना प्रवेश देणे धोक्याचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या भूखंडावरील तीन इमारतींत ४३ सदनिका असून त्यात बेस्टचे अधिकारी व कर्मचारी वास्तव्यास आहेत. पालिकेच्या या नवीन प्रस्तावामुळे येथील कर्मचाऱ्यांना सक्तीने स्थलांतरित करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या रिक्त होणाऱ्या सदनिका भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रशासनाने घाईघाईने निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
बेस्टचा वाहतूक तोटा भरून काढण्यासाठी पालिकेने अनुदान देणे बंधनकारक असताना जागा विकून पैसा उभा करणे, हे चुकीचे धोरण असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याप्रकरणी आता पालिका प्रशासन आणि राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
.........
प्रमुख मागण्या
- मलबार हिल येथील आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा.
- या प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.
- बेस्ट कामगारांच्या सेवा शर्तींचा भंग थांबवून त्यांना हक्काची निवासस्थाने मिळावीत.
......
बेस्ट समिती अध्यक्षपदाचा पदभार मी नुकताच स्वीकारला आहे. या प्रकरणाची मी माहिती मागितली आहे. ती बघून त्याबाबतचा योग्य तो निर्णय घेतला जाईल; मात्र कामगारांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. अनागोंदी कारभार आता खपवून घेतला जाणार नाही.
- तृष्णा विश्वासराव, अध्यक्ष, बेस्ट समिती
.......
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

