मुंबईच्या कचरा व्यवस्थापनाचा कायापालट!

मुंबईच्या कचरा व्यवस्थापनाचा कायापालट!

Published on

मुंबईच्या कचरा व्यवस्थापनाचा कायापालट!
वर्सोवा, गोराई केंद्रांचे आधुनिकीकरण होणार; ५८० कोटींची भरीव तरतूद
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २६ : महानगरातील वाढत्या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी पालिकेने वर्सोवा आणि गोराई येथील कचरा हस्तांतरण केंद्रांच्या आधुनिकीकरणाचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या कामासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ५८०.८२ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे.
पालिकेच्या नियोजनानुसार, वर्सोवा आणि गोराई येथील हे प्रकल्प जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
​केवळ हस्तांतरण केंद्रेच नव्हे, तर कचऱ्यापासून वीज आणि वायू निर्मितीवरही पालिकेचा भर आहे. देवनार येथे दररोज ६०० टन कचऱ्यापासून सात मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रगतिपथावर असून, तो जून २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. देवनार येथे दररोज ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी निर्मितीसाठी महानगर गॅस लिमिटेडसोबत करार करण्यात आला आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२७ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे, तर मुलुंड येथील साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून मार्च २०२६ पर्यंत २४ हेक्टर जागा मोकळी करण्याचे नियोजन आहे.
​देवनार येथील १८५ लाख मेट्रिक टन जुन्या साठलेल्या कचऱ्याचे जैव-शुद्धीकरण (बायोमायनिंग ) करून ११० हेक्टर जागा पुन्हा मिळवण्यासाठी पालिकेने ३०३५.५५ कोटी रुपयांचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. हे काम मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
​ ​डायघर आणि दहिसर येथे प्रत्येकी ६०० टन क्षमतेचे दोन प्रकल्प आधीच कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुमारे २.३० लाख मेट्रिक टन बांधकाम आणि निष्कासन कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.​ कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धतींशी सुसंगत राहण्यासाठी मुंबई महापालिका तंत्रज्ञानावर भर देत आहे. वर्सोवा आणि गोराई केंद्रांचे आधुनिकीकरण हा याच मोठ्या धोरणाचा एक भाग आहे, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ने-आण करणे अधिक सुलभ
​ ​वाढत्या नागरीकरणामुळे कचरा हस्तांतरण केंद्रांवर येणारा ताण लक्षात घेता, या केंद्रांची कार्यक्षमता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज बनली आहे. या आधुनिकीकरणामुळे कचऱ्याची ने-आण करणे अधिक सुलभ आणि दुर्गंधीमुक्त होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com