ताडदेव-नागपाडा रेल्वे उड्डाणपुलाचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ नामकरण; मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण

ताडदेव-नागपाडा रेल्वे उड्डाणपुलाचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ नामकरण; मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण

Published on

ताडदेव-नागपाडा रेल्वे उड्डाणपूल खुला
मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण; ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ नामकरण
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २६ : ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरुवारी (ता. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. सायंकाळपासून पूल वाहतुकीस खुला करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरून दोन्‍ही दिशेने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्‍ध झाला आहे.

सुमारे १३० वर्षे जुन्या झालेल्या पुलाची पुनर्बांधणी महापालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पालिकेच्या यंत्रणेचे विशेष कौतुक केले. ​दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार गोपीचंद पडळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ​हा पूल १ ऑक्टोबर २०२४ मध्ये बांधकामासाठी घेण्यात आला होता. रेल्वे हद्दीतील कठीण काम असूनही पालिकेने हे काम ६ जानेवारी २०२६ मध्ये म्हणजेच अवघ्या १५ महिने सहा दिवसांत पूर्ण केले. मुदतीपूर्वी चार महिने आधी काम पूर्ण झाल्यामुळे हा एक विक्रम ठरला आहे.

वाहतूक कोंडी कमी होईल
​या पुलामुळे गेल्या दोन वर्षांपासून विस्कळित झालेली पूर्व-पश्चिम वाहतूक पुन्हा सुरळीत होणार आहे. याचा फायदा प्रामुख्याने ​जहांगीर बोमन बेहराम मार्ग आणि डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (ग्रॅन्ट रोड),​ पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक परिसराला होईल. यामुळे येथील वाहतूक कोंडी कमी होईल. ​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श प्रशासक कसा असावा, याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. त्यांच्या युद्धकुशलतेसोबतच समाजकल्याण आणि आर्थिक प्रगतीचा वारसा पुढे नेण्यासाठी या पुलाला त्यांचे नाव देण्यात येत आहे.

​मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका कटिबद्ध असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली, की गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग, विद्याविहार, सायन, महालक्ष्मी, नेहरू तारांगण आणि मानखुर्द येथील सहा मोठे उड्डाणपूल लवकरच जनतेसाठी खुले केले जातील. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, दत्तात्रय भरणे, आमदार अमीन पटेल, पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह रेल्वे आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com