स्थानकांवरील प्रवासी सुविधांत वाढ; एस्केलेटर, लिफ्टसह एलईडी दिव्यांची उभारणी
स्थानकांवरील प्रवासी सुविधांत वाढ
मध्य रेल्वेवर एस्केलेटर, लिफ्टसह एलईडी दिव्यांची उभारणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने स्थानकांवरील विविध सुविधांमध्ये वाढ केली आहे. जानेवारी महिन्यात एस्केलेटर, लिफ्ट, ऊर्जा कार्यक्षम पंखे, एलईडी दिवे तसेच माहिती देणारे इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत.
प्रवाशांना फलाट बदलताना सुलभता मिळावी, यासाठी कसारा स्थानकावर दोन आणि बदलापूर स्थानकावर दोन असे एकूण चार एस्केलेटर सुरू करण्यात आले आहेत. तसेच वांगणी आणि बदलापूर स्थानकांवर प्रत्येकी एक अशा दोन नवीन लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी या सुविधांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानकांवरील वायुवीजन सुधारण्यासाठी विविध ठिकाणी १४२ नवीन बीएलडीसी पंखे बसविण्यात आले आहेत. २८९ जुने पंखे बदलण्यात आले आहेत. हे पंखे पारंपरिक पंख्यांच्या तुलनेत अधिक ऊर्जा कार्यक्षम असून सुमारे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत वीज बचत करतात. दादर स्थानकावरील विविध फलाटांवर आठ एचव्हीएलएस पंखे बसविण्यात आहेत. मोठ्या जागेत हवा समान रीतीने फिरवून थंडावा निर्माण करण्यास ते उपयुक्त ठरतात.
प्रकाशयोजनेत सुधारणा
स्थानकांवरील प्रकाशयोजना सुधारण्यासाठी ३६२ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले असून १,६३५ जुने दिवे बदलण्यात आले आहेत. हे दिवे अधिक प्रकाश देणारे, दीर्घकाळ टिकणारे आणि ऊर्जा बचत करणारे असल्याने देखभाल खर्चही कमी होणार आहे.
माहिती प्रणाली अद्ययावत
प्रवाशांना गाड्यांची माहिती स्पष्टपणे मिळावी, यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन ट्रेन डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले आहेत. तसेच नेरूळ, पनवेल, डॉकयार्ड रोड, शिवडी आणि रे रोड या स्थानकांसह विविध उपनगरी स्थानकांवर एकूण ५६ नवीन इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत. नेरूळ येथील पादचारी पुलावरही सहा इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

