मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करू
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा निर्धार
मुंबई, ता. २७ : जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषाच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात व्यक्त केला.
कार्यक्रमास व्यासपीठावर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात मराठी भाषा शुद्ध होण्यासाठी शब्दकोश तयार केला. त्या वेळी प्रशासन चालविताना मराठीवर फारशी, अरबी या भाषांचे आक्रमण होते. त्यामुळे मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. मराठी भाषेचा अभिमान हा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होतो. सुरुवातीच्या काळातील आद्य ग्रंथांमधून आपली मराठी भाषा किती अभिजात आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. मराठीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन राजाश्रय मिळवून दिला आहे. मराठी भाषा, आपल्या भाषेतील साहित्य आणि लोककला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
दरम्यान, मराठी भाषेला समृद्ध करायचे असेल, पुढे न्यायचे असेल तर तंत्रज्ञान, संशोधने ही मराठी भाषेतूनच झाली पाहिजेत. तेव्हा मराठी ही ज्ञानभाषा होईल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी माणसाच्या रक्तातच विनोद आहे. विनोद हा समाजामध्ये माणूस जोडणारा पूल आहे. त्यामुळे संकटातही जो विनोद शोधतो, तोच खरा मराठी माणूस आहे, अशा शब्दात शिंदे यांनी मराठी माणसाचा गौरव केला. उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून मराठीची समृद्धी वाढविली पाहिजे. विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरात विविध देशांमध्ये कार्यरत असलेल्या मराठी बांधवांना आपण एकत्र आणण्याचे काम केले आहे. अशा या समृद्ध मराठीचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे आवाहनही या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येक डिजिटल माध्यमांचा उपयोग करताना मराठीचा उपयोग करीत अधिक सक्षमपणे पुढील पिढीपर्यंत समृद्ध मराठीचा वारसा नेण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे समस्त मराठी जन आनंदित झाले आहे. हा मराठी भाषेचा खूप मोठा गौरव आहे. मराठी भाषा ही अर्थार्जनाची भाषा होण्यासाठी हा दर्जा निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करीत मराठी साहित्याची महती विशद केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मराठी भाषा समितीप्रमुख आशुतोष काळे यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान ‘लोकसेवेचा लोकजागर’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला मंत्री, राज्यमंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने यांनी केले. ‘जावे विनोदाच्या गावा’ कार्यक्रम सादर करणाऱ्या कलावंतांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
--
‘जावे विनोदाच्या गावा’ विशेष कार्यक्रम
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमामध्ये विनोदी कविता, विडंबन गीत, मराठी गीत सादर करण्यात आले. गायक श्रीरंग भावे आणि गायिका अदिती प्रभुदेसाई यांनी गीत सादर केले. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी लेखाचे वाचन केले. ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा’ जयवंत दळवी लिखित लेखाचे वाचन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले. मंगेश पाडगावकर लिखित कवितेचे केदार शिंदे यांनी वाचन केले. तसेच वि. दा. करंदीकर लिखित ‘साठीचा गजर’ कविता ऋषिकेश जोशी यांनी सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

