मराठी भाषा बोलणे आणि तिचे जतन करणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.- ‘हेडाम’ कादंबरीचे लेखक नागू विरकर
मराठी भाषा जतन करणे, ही सर्वांची जबाबदारी
लेखक नागू वीरकर यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. २७ : मराठी भाषेचा उगम, तिची समृद्ध साहित्यपरंपरा, संत वाङ्मयाची परंपरा, तसेच आधुनिक साहित्याच्या विविध प्रवाहांचा सखोल आढावा घेतला. मराठी ही केवळ प्रादेशिक भाषा नसून ती विचारांची, संस्कृतीची आणि सामाजिक परिवर्तनाची भाषा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व कथाकथनकार नागू वीरकर यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात केले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिवाजी सरगर, यांच्यासह मुंबई विद्यापीठातील डॉ. अनिल बनकर, महिला उद्योजिका उज्ज्वला गलंडे, डॉ. नीलेश देशमुख, डॉ. कल्पना सरगर, प्रा. वैशाली कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
वीरकर पुढे म्हणाले, ग्रामीण जीवन, लोकसंस्कृती आणि बोलीभाषांच्या जतनाचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे भाषा जिवंत ठेवायची असेल तर ती घराघरांत, शाळांत आणि व्यवहारात वापरली गेली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी मराठी भाषेचे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या ओळखीचा, संस्कारांचा आणि विचारपरंपरेचा आधारस्तंभ आहे. आजपासून कार्यालयीन व्यवहारात मी कर्मचाऱ्यांशी मराठीतूनच संवाद साधण्याची शपथ घेतो, असे ठामपणे जाहीर करत त्यांनी मराठीचा दैनंदिन वापर वाढवण्याचे आवाहन केले. इंग्रजी विषयाचे प्रमुख असूनही त्यांनी संपूर्ण भाषणात एकही इंग्रजी शब्द न वापरता मराठीप्रेमाचा आदर्श घालून दिला.
तसेच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मातृभाषेत शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत, विद्यार्थ्यांनी ज्ञाननिर्मितीत मराठीचा अधिकाधिक वापर करावा, संशोधन आणि लेखन मराठीतून व्हावे, असे मत व्यक्त केले. मराठी भाषेचा सन्मान हा केवळ औपचारिकतेपुरता न राहता तो कृतीतून दिसला पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. दरम्यान, महिला उद्योजिका उज्ज्वला गलंडे यांनी मराठी भाषेची जागतिक स्तरावरील ताकद अधोरेखित केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

