पीएमजीपी वसाहत पुनर्विकासातून म्हाडाला ९०० घरांची लाॅटरी

पीएमजीपी वसाहत पुनर्विकासातून म्हाडाला ९०० घरांची लाॅटरी

Published on

म्हाडाला ९०० घरांची लाॅटरी
पीएमजीपी वसाहत पुनर्विकासातून १८ मजली चार विंग उभारण्याचे नियोजन; अल्प आणि मध्य उत्पन्न गटाची घरे तयार करणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला तब्बल ८५०-९०० घरांची लाॅटरी लागणार आहे. पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा स्वत: कंत्राटदाराची नियुक्ती करून करणार आहे. त्यासाठी रहिवाशांसोबत लवकरच करार केला जाणार असल्याने ९४२ जणांचे घराचे स्वप्न साकार होणार असून म्हाडालाही मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत. एप्रिल- मे महिन्यामध्ये या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असून पुढील तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे म्हाडाला लाॅटरीसाठी मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत.

१९९०च्या दशकात पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी पूनमनगर येथे पीएमजीपी वसाहत उभारली असून त्यामध्ये चार मजली १७ इमारती आहेत. त्यानुसार ९४२ निवासी व ४२ अनिवासी अशा एकूण ९८४ गाळे आहेत; मात्र संरचनात्मक अहवालानुसार सध्या या इमारती अत्यंत जीर्णावस्थेत आहेत. २७ हजार ६२५ चौरस मीटर भूखंडावर असलेल्या या वसाहतीचा राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडा पुनर्विकास म्हाडा करणार आहे. त्यासाठी ईपीसी कंत्राटदार म्हणून बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. म्हाडाकडून येथील ९४२ रहिवाशांना प्रत्येकी ४५० चौरस फुटांची सुसज्ज सदनिका मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दोन लाख रुपये काॅर्पस फंड दिला जाणार असून त्यावर म्हाडाकडून सुमारे ४५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याबदल्यात पुनर्वसन इमारती उभारून शिल्लक राहणाऱ्या जागेवर म्हाडाचे सुमारे ८५०-९०० अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिका तयार करता येतील एवढे बांधकाम करण्याचे नियोजन असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या घरांची लाॅटरीच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे.

५० टक्के भूखंडावर विक्रीयोग्य सदनिका
पीएमजीपी वसाहत जवळपास २७ हजार ६२५ चौरस मीटरच्या भूखंडावर वसली आहे. सध्या त्या ठिकाणी चार मजली १७ इमारती असल्या तरी म्हाडाच्या नियोजनानुसार आता तेथे बहुमजली इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे जवळपास ५० टक्के भूखंडावर पुनर्वसन इमारती होणार असून उर्वरित ५० टक्के म्हणजे १३-१४ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर म्हाडाला विक्रीयोग्य सदनिका उभारणे शक्य होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पावर म्हाडाचे सुमारे ८५० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

एका विंगमध्ये चार इमारती
म्हाडाकडून विक्रीयोग्य सदनिकांसाठी चार विंग उभारण्याचे नियोजन आहे. एका विंगमध्ये चार इमारती असणार असून त्यामध्ये २०० सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे पुनर्वसन सदनिकांप्रमाणेच विक्रीयोग्य सदनिका प्रशस्त आणि सर्व सोयींनी सज्ज होणार आहेत.

फनेल झोनचा आडसर
पीएमजीपी वसाहतीचा परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने येथे म्हाडाला १७-१८ मजली म्हणजे सुमारे ५५ मीटर उंचीच्या इमारती उभारता येणार आहेत. त्यामुळे उपलब्ध भूखंडावरच पुनर्वसन सदनिका, विक्रीयोग्य सदनिका आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ग्राफिक्स
- विक्रीयोग्य सदनिका - ८५०-९००
- चार विंगमध्ये प्रत्येकी चार इमारती
- एलआयजी सदनिकांचे क्षेत्रफळ - ४५० चौरस फूट
- एमआयजीच्या सदनिकांचे क्षेत्रफळ - ६५० चौरस फूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com