मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ''अंडरग्राउंड'' तोडगा! ४,३९२ कोटींचा ''मल्टी-मॉडेल टनेल'' प्रकल्प; एकाच बोगद्यात धावणार गाड्या अन् सांडपाणी
मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘अंडरग्राउंड’ तोडगा!
४,३९२ कोटींचा ‘मल्टी-मॉडेल टनेल’ प्रकल्प; एकाच बोगद्यात धावणार गाड्या अन् सांडपाणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीचा विळखा सोडवण्यासाठी आणि पावसाळ्यात शहराला ‘तुंबई’ होण्यापासून वाचवण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरात ‘मल्टी-मॉडेल’ भूमिगत बोगद्यांचे जाळे विणले जाणार आहे. या एकाच बोगद्यात दुहेरी थर असणार आहेत. वरच्या स्तरावर वाहने धावतील, तर खालच्या स्तरावर नागरी सुविधा आणि मलनिस्सारणाची व्यवस्था असेल. सहा किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पालिकेने ४,३९२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. हा प्रकल्प केवळ रस्ता नसून मुंबईच्या पायाभूत सुविधांमधील एक चमत्कार ठरणार आहे.
पाणी वेगाने उपसणे शक्य
या बोगद्याची रचना ‘मल्टिलेयर’ स्वरूपाची असेल. एका थरावर खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी रस्ता असेल. ज्यामुळे रस्त्यावरील गाड्यांचा भार कमी होईल. तर दुसऱ्या थरावर मलनिस्सारण वाहिन्या आणि इतर सेवा असतील. मुसळधार पावसाच्या वेळी हा स्तर ‘पूर प्रतिबंधक’ म्हणून काम करेल. त्या वेळी पावसाचे पाणी वेगाने उपसणे शक्य होईल.
कार्यादेश जारी
या सहा किलोमीटरच्या बोगद्यासाठी प्रति किलोमीटर सुमारे ७३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचा एकूण कंत्राट कालावधी ६६ महिने (साडेपाच वर्षे) इतका निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या तांत्रिक बाजू तपासण्यासाठी आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करून त्यांना कार्यादेश जारी केला आहे.
तज्ज्ञ सल्लागाराची मदत
हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा असल्याने, निविदा प्रक्रिया व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष बांधकामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेतली जात आहे. सल्लागाराने आपला अहवाल सादर केल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. यामुळे मुंबईच्या भूमिगत कनेक्टिव्हिटीमध्ये एक नवा अध्याय सुरू होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आखला आहे. यामुळे जमिनीवरची जागा वाचेल आणि एकाच वेळी वाहतूक व पाणी निचरा या दोन मोठ्या समस्यांवर उपाय मिळेल, असे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.
........
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
प्रकल्प खर्च : ४,३९२ कोटी रुपये
बोगद्याची लांबी : ६ किलोमीटर
कालावधी : ६६ महिने
दुहेरी फायदा : वाहतूक कोंडीतून सुटका आणि पूर नियंत्रण
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

