पर्यावरणपूरक होळीचा संकल्प

पर्यावरणपूरक होळीचा संकल्प

Published on

पर्यावरणपूरक होळीचा संकल्प
निसर्ग जपण्यासाठी महापालिकेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : होळी, धूलिवंदन व रंगपंचमी हे सण मुंबईकरांनी आनंदात, पण जबाबदारीने साजरे करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. सण साजरे करताना झाडे किंवा झाडांच्या फांद्या तोडू नयेत आणि पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २) होणाऱ्या होलिका दहनासाठी झाडे तोडू नका. पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करताना केवळ कोरड्या लाकडाचा वापर करावा. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे पालिकेने म्हटले आहे.

होळीमध्ये रासायनिक रंग लावलेले लाकूड, प्लॅस्टिक, रबर, टायर किंवा अन्य घातक पदार्थ जाळणे टाळावे. यातून निघणारा धूर आणि प्रदूषण आरोग्यास अत्यंत हानिकारक असते. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांनी ‘पर्यावरणपूरक होळी’ साजरी करण्यावर भर द्यावा. मंगळवारी (ता.३) रोजी साजऱ्या होणाऱ्या धूलिवंदनासाठी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगांचा वापर करावा. रासायनिक रंगांमुळे त्वचा आणि डोळ्यांना इजा होऊ शकते. तसेच, शक्यतो कोरड्या रंगाने होळी खेळून पाण्याची बचत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

उत्सवाचा आनंद घेताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषतः रुग्णालये, निवासी भाग आणि शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत व आवाजाची पातळी मर्यादित ठेवावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन हे सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे. ‘स्वच्छ आणि निरोगी मुंबई’साठी मुंबईकरांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com