कर्करोग प्रतिबंधासाठी पाऊल

कर्करोग प्रतिबंधासाठी पाऊल

Published on

कर्करोग प्रतिबंधासाठी पाऊल
एक लाख ३० हजार मुलींचे एचपीव्ही लसीकरणाचे उद्दिष्ट; महापालिकेची व्यापक तयारी
मुंबई, ता. ४ ः गर्भाशय मुखाचा कर्करोग हा जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हा आजार भविष्यात होऊ नये, यासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या; परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या वयाच्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. मुंबईतील एक लाख ३० हजार मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून यात पालिका शाळांतील २४ हजार ९३६ मुलींचा समावेश आहे. येत्या आठवड्यापासून ‘यू-विन’ पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.
देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ अजमेर (राजस्थान) येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मोहिमेची सुरुवात मुंबईसह महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते करण्यात आला.
टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथे १४ वर्षे पूर्ण झालेल्या पाच लाभार्थ्यांना एचपीव्ही लस देऊन राज्‍यस्तरीय मोहिमेची सुरुवात करण्यात आली. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा कर्करोग हयुमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो आणि हा एकमेव कर्करोग आहे, जो लसीकरणाने टाळता येऊ शकतो. या मोहिमेसाठी मुंबई महापालिकेस सद्यःस्थितीत एचपीव्ही लसीच्या २० हजार १६० मात्रा प्राप्त झाल्या आहेत.

२३६ आरोग्य केंद्र २७ प्रसूतिगृहावर लसीकरण
लसीकरण मोहीम पुढील तीन महिने सलग सुरू राहील आणि त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. या लसीच्या सुविधा पालिकेतील २३६ आरोग्य केंद्र, २७ प्रसूतिगृहे, १६ सर्वसाधारण रुग्णालय व पाच वैद्यकीय महाविद्यालय अशा एकूण २८४ आरोग्य संस्था येथे देण्यात येईल.

१७.७ टक्के महिलांमध्ये प्रादुर्भाव!
भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. २०२२ मध्ये भारतामधील कर्करोगाचा प्रादुर्भाव एक लाख महिलांमागे १७.७ टक्के इतका होता. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने एचपीव्ही लस ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची केंद्र शासनास शिफारस केली.

पालकांची संमती गरजेची!
लसीकरण मोहिमेंतर्गत लाभार्थी मुलींना ‘गार्डसिल-४’ या एचपीव्ही लसीची एक मात्रा (०.५ मिली) डाव्या दंडावर स्नायूमध्ये दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर त्यांच्या डाव्या तर्जनीच्या नखावर मार्कर पेनने मार्किंग करण्यात येणार आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून त्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यकता आहे.

लसीकरणाची नोंदणी पोर्टलवर
सर्व लाभार्थ्यांची लसीकरणासाठीची नोंदणी आणि प्रमाणपत्र वाटप हे केंद्र शासनाकडील ‘यू-विन’ पोर्टलद्वारे पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे.

लसीकरणानंतरची संभाव्य लक्षणे
लस दिल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी सूज येऊ शकते, जी दोन ते तीन दिवसांत बरी होते. प्रत्येक केंद्रावर त्वरित उपचारासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. तथापि, गंभीर आजार असलेल्या मुली, ज्यांना यिस्टची ॲलर्जी आहे किंवा ज्या गर्भवती आहेत, त्यांनी ही लस देण्यात येणार नाही.

वैद्यकीय अधिकारी, परिचारिका प्रशिक्षण पूर्ण
ही मोहीम मुंबई महापालिकेमध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महापालिकास्तरीय अधिकारी, २६२ वैद्यकीय अधिकारी, १००८ परिचारिका, ४४२८ आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com