म्हाडा वसाहतींतील पाणीपुरवठ्याची जबाबदारी रहिवाशांवर?

म्हाडा वसाहतींतील पाणीपुरवठ्याची जबाबदारी रहिवाशांवर?

Published on

म्हाडा वसाहतींतील पाणीपुरवठ्याची जबाबदारी रहिवाशांवर?
६५-७० कोटींची थकबाकी; सोसायट्यांच्या असहकारामुळे म्हाडा धोरणात्मक निर्णयाच्या तयारीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : म्हाडाच्या मुंबईत ५६ वसाहती असून, त्यावर हजारो सदनिका आहेत. तेथील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता आदी सुविधा आतापर्यंत म्हाडाकडून पार पाडल्या जात आहेत. मात्र, पाणीबिलाची वाढती थकबाकी आणि सोसायटीच्या असहकार धोरणामुळे म्हाडाने पाणीपुरवठ्याची जबाबदारी राहिवाशांवर टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जबाबदारी रहिवाशांवर येणार असल्याने ते काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत अंधेरी डीएन नगर, कुर्ला, अभुदय नगर, घाटकोपर, मालाड, पवई, वरळी, कांदिवली, गोरेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाच्या वसाहती आहेत. त्यावर निवासी गाळे असून, त्यामध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. म्हाडा पालिकेच्या माध्यमातून त्यांना पाणीपुरवठा करत आहे. सदर पाणीबिलाची रक्कम म्हाडा संबंधित रहिवाशांकडून वसूल करून पालिकेला भरते.
अनेक सोसायट्या, रहिवासी म्हाडाला पाणीबिलाचे पैसे भरत नाहीत. त्यामुळे पाणीबिलाची एकूण थकबाकी ६५ ते ७० कोटींपर्यंत वाढली आहे. त्याबाबत पालिकेकडून सातत्याने म्हाडाला नोटीस पाठवल्या जात आहेत. त्याची दखल घेत म्हाडाने आता पाणीपुरवठ्याच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या हालचाली सुरू केले आहेत. पाणीपुरवठादार पालिका आहे, पाणी वापरणारे रहिवासी आहेत. त्यामध्ये आमचे मरण का, असे म्हणत ही जबाबदारी आता थेट रहिवाशांवर टाकण्याचा विचार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

अनेक जोडण्या बंद, पण बिल सुरू
म्हाडाच्या लेआऊटवर असलेल्या अनेक इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. त्यामुळे संबंधित सोसायट्यांनी स्वतंत्र नळजोडणी घेतली असली तरी जुन्या जोडण्या अद्यापही रेकॉर्डवर आहेत. त्यामुळे पालिकेकडून या नळजोडणीचे म्हाडाला पाणीबिल पाठवले जात असून, ते पुढे रहिवाशांवर पडत आहे. त्याचाही नाहक भुर्दंड बसत आहे. पाण्याचा वापर कमी असतानाही बिल येत असल्याने या नळजोडण्या कमी केल्या जाणार आहेत. त्यामुळे म्हाडावरील पर्यायाने राहिवाशांवरील भार कमी होईल.

सोसायट्या, पालिकेला पत्र देणार
आतापर्यंत म्हाडा आपल्या वसाहतीतील रहिवाशांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचे बिल स्वतः भरून ते रहिवाशांकडून वसूल करत होते. मात्र, रहिवासी, अनेक सोसायटी पाणीबिल भरत नसल्याने त्याची थकबाकी वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणीबिल भरण्याची जबाबदारी संबंधित सोसायटीची असल्याचे पत्र त्यांना दिले जाणार आहे. तसेच पालिकेलाही रहिवाशांना, सोसायट्यांना पाणीबिल पाठवावे, असे पत्र दिले जाणार आहे. त्याबाबतचा लवकरच म्हाडा धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com