आठवीतील विद्यार्थ्याची हत्या करून अपघाताचा आभास

आठवीतील विद्यार्थ्याची हत्या करून अपघाताचा आभास

Published on

हत्या करून अपघाताचा आभास
तीन अल्पवयीन मित्र ताब्यात; भांडुप येथील घटना

मुंबई, ता. १ ः आठवीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून आपल्याच मित्राची हत्या करून तो अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला; मात्र शवचिकित्सेत ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलिस तपासात या तिघांचे बिंग फुटले. २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान घडलेल्या या घडामोडींमुळे भांडुप हादरले.
सिद्धार्थ लोंढे (१४) असे मृताचे नाव आहे. २३ फेब्रुवारीला त्याचा मृतदेह विहार तलावात आढळला. भांडुपच्या टेंभीपाडा आणि डोंगराळ भागातील नागरिक विहार तलावात पोहण्यासाठी, मासे पकडण्यासाठी जातात. त्यामुळे सिद्धार्थही पोहता पोहता बुडाला असावा, असा अंदाज कुटुंबीय, पोलिसांना होता. अपघाती मृत्यूची नोंद करून पोलिसांनी चौकशीही सुरू केली. दरम्यान, दोन दिवसांनी राजावाडी रुग्णालयाच्या सिद्धार्थचा शवचिकित्सा अहवालाने सर्वांनाच धक्का बसला. सिद्धार्थचा मृत्यू पाण्यात बुडून नव्हे तर डोक्यावर अवजड वस्तूच्या प्रहाराने झाला. त्याची हत्या झाली, असे या अहवालात नमूद होते. त्यानुसार भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सिद्धेश्वर पुजारी, सहाय्यक निरीक्षक किशोर मेढे यांनी तपास सुरू केला.
२२ फेब्रुवारीला सिद्धार्थ खेळायला जातो सांगून घराबाहेर पडला; मात्र रात्री उशिरापर्यंत परतला नव्हता. पालकांनी मध्यरात्री पोलिस ठाणे गाठून तो हरविल्याची तक्रार दिली होती. आदल्या दिवशी अभ्यासावरून वडील ओरडल्याने रागाच्या भरात त्याने घर सोडले की काय, ही शंका आकार घेत असतानाच त्याचा मृतदेह सापडला होता.
परिसरात राहणाऱ्या मित्रासोबत तलावाच्या दिशेने जाताना सिद्धार्थला काहींनी अखेरचे पाहिले होते. तोच धागा पकडून पोलिसांनी त्या १४ वर्षीय मित्राकडे चौकशी केली. त्याने सिद्धार्थ आणि अन्य दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलो होतो, तेव्हा सिद्धार्थ बुडाला. घाबरल्याने आम्ही तिघे तेथून पळून गेलो, असे हा विद्यार्थी सांगत होता. अन्य दोघांनीही तेच सांगितले. तेव्हा पोलिसांनी तिघांकडे स्वतंत्रपणे कौशल्यपूर्ण चौकशी केली तेव्हा त्यातील एकाने मारहाणीत सिद्धार्थचा मृत्यू झाला. घाबरल्याने त्याचा मृतदेह पाण्यात फेकल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार तिघांना ताब्यात घेत बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सध्या तिघांना डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

दादागिरीला कंटाळून हत्या
सिद्धार्थ आमच्यावर सतत दादागिरी करत असे. २२ फेब्रुवारीला पोहत असतानाही त्याने दादागिरी सुरू केली. त्यावरून भांडण झाले. हाणामारी झाली. त्यात एकाने जवळच पडलेली झाडाची फांदी सिद्धार्थच्या डोक्यात घातली, असे आरोपी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्यांचा दावा पडताळण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. या आधी सिद्धार्थ आणि या तिघांचे उघड वाद, भांडणे, हाणामारीचे प्रसंग समोर आलेले नाहीत. ही हत्या सुनियोजित कटाचा भाग होता का, या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com