बाबा सिद्दीकी हत्येशी बिल्डर लॉबीचा संबंध नाही!
बाबा सिद्दीकी हत्येशी बिल्डर लॉबीचा संबंध नाही!
पोलिसांची न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिल्डर लॉबीचा सहभाग किंवा कोणताही संबंध नाही, हा आरोप कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केवळ संशय आणि अनुमानांवर आधारित आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात नुकतीच प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.
कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाचा बाबा सिद्दीकी हत्येशी संबंध असल्याचे पुरावे सापडले नाहीत. ही हत्या अनमोल बिश्नोईच्या नेतृत्वाखालील संघटित गुन्हेगारी सिंडिकेटने दहशत निर्माण करण्यासाठी आणि वर्चस्व आणि आर्थिक लाभ मिळविण्यासाठी केली होती, असे तपासअंती सिद्ध झाल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) किशोरकुमार शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तसेच अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यास भाग पाडणे, हे तपास अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये कायद्याच्या अधीन राहून सातत्याने व प्रामाणिकपणे पार पाडल्याचे द्योतक आहे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे सिद्दीकी यांच्या पत्नीचे पोलिसांविरुद्ध आरोप वस्तुतः चुकीचे, बिनबुडाचे आणि न्यायालयात पोलिस यंत्रणेची प्रतिमा खराब करण्याच्या गुप्त हेतूने केल्याचा दावाही प्रतिज्ञापत्रातून पोलिसांनी केला आहे. तसेच सिद्दीकी या पोलिस अधिकाऱ्यांवर त्यांच्या इच्छेनुसार अज्ञात, गुप्त हेतूने प्रकरणाचा तपास करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही स्पष्ट म्हटले आहे.
...
प्रकरण काय?
वांद्रे पूर्व येथे तीन हल्लेखोरांनी १२ ऑक्टोबर २०२४च्या रात्री ६६ वर्षीय सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली असून, पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी आणि एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा दाट संशय सिद्दीकींच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनी वकील त्रिवनकुमार कर्णानी यांच्यामार्फत याचिकेत केला आहे. बाबा सिद्दीकी नेहमीच गरीब झोपडपट्टीवासीयांच्या हितासाठी झटत होते. म्हणूनच परिसरातील अनेक विकसक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी ते अडथळा ठरत होते. तरीही पोलिसांनी या दृष्टिकोनातून तपास केला नाही. संशयित गुन्हेगारांचे सध्याच्या सत्ताधारी राज्य सरकारशी संबंध आहेत. म्हणून स्वतंत्र तपास संस्थेद्वारे चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

