मुंबई महानगरपालिकेचा ''एआय'' अवतार! आयआयटी मुंबईसोबत धोरणात्मक भागीदारी; नागरिकांच्या मदतीला आता ''एआय कोच''
मुंबई महापालिकेचा ‘एआय’ अवतार!
आयआयटीसोबत धोरणात्मक भागीदारी; नागरिकांसाठी ‘एआय कोच’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महापालिका आता केवळ रस्ते आणि पायाभूत सुविधांपुरती मर्यादित न राहता माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही देशातील आघाडीची संस्था बनली आहे. महापालिकेने भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे.
नागरिकांना पालिकेच्या विविध ऑनलाइन सेवांचा लाभ घेताना अडचण येऊ नये, यासाठी बीएमसी सिटीजन एआय कोच हा डिजिटल मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना नवीन प्रणालींचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘बीएमसी एम्प्लोयीआय कोच’ विकसित केला जात आहे.
प्रशासकीय निर्णय अधिक अचूक आणि पुराव्यावर आधारित असावेत, यासाठी पालिकेने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई यांच्याशी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे संसाधनांचे कार्यक्षम वाटप आणि भविष्यातील नागरी नियोजनासाठी प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करणे सुलभ होणार आहे. इमारतींच्या बांधकाम मंजुरी प्रक्रियेत एआय आणि एमएलचा समावेश केल्यामुळे मानवी चुका कमी होतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाबी तत्काळ उघड होतील. शहरातील विकासकामांचा कल अभ्यासण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे शहरी नियोजनाची फलश्रुती सुधारेल.
घरबसल्या देयके भरू शकतील
महापालिकेने आपली मुख्य एंटरप्राइज प्रणाली आता ‘राईज विथ सॅॅप-प्रायव्हेट क्लाऊड एडिशन’वर स्थलांतरित केली आहे. यामुळे पालिकेचा डेटा अधिक सुरक्षित राहणार आहे. तर रिअल-टाइम माहितीच्या आधारे जलद निर्णय घेणे शक्य होईल. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवा अभिलेखदेखील अद्ययावत केले जात आहेत. नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरणे सोपे व्हावे यासाठी पालिकेने डिजिटल पेमेंट गेटवे आणि क्यूआर कोड सुविधा सुरू केली आहे. विशेष म्हणजे बँकांमार्फत ही सेवा नागरिकांना आणि पालिकेला मोफत पुरवली जाणार आहे. व्हॉट्सॲप, एसएमएस आणि ईमेलवर मिळणाऱ्या लिंकद्वारे नागरिक घरबसल्या देयके भरू शकतील.
४४.८८ कोटींची भरीव तरतूद
विभागांना स्वतःची सॉफ्टवेअर्स जलदगतीने विकसित करण्यासाठी लो कोड, नो कोड या प्लॅटफॉर्मची मदत होणार आहे. नियोजन, देवनार पशुवधगृह आणि चौकशी खात्याचे कामकाज आता पूर्णपणे संगणकीकृत झाले आहे. मलबार हिल येथील निसर्ग पायवाटेसाठी आता पूर्णपणे पेपरलेस बुकिंग आणि संपर्करहित प्रवेशाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल परिवर्तनासाठी पालिकेने २०२५-२६च्या सुधारित अंदाजात १४४.४१ कोटी आणि २०२६-२७च्या अर्थसंकल्पीय अंदाजात ४४.८८ कोटींची भरीव तरतूद केली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून पारदर्शकता आणणे आणि नागरिकांचा वेळ वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे. एआय आणि प्रगत विश्लेषणाद्वारे आम्ही मुंबईला भविष्याभिमुख बनवत आहे, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

