‘शिवनेरी’ ची सेवा राज्यभर

‘शिवनेरी’ ची सेवा राज्यभर

Published on

‘शिवनेरी’ची सेवा राज्यभर
प्रमुख शहरांत धावणार; ज्‍येष्‍ठांना सवलत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई-पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बससेवा आता राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाची मंगळवारी (ता. ३) मुंबईत बैठक झाली.
२००२मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांचा विश्वास जिंकला. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. महिला प्रवाशांना तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. सध्या दादर-स्वारगेट, दादर-शिवाजीनगर, बोरिवली-स्वारगेट, बोरिवली-शिवाजीनगर, ठाणे-स्वारगेट आणि ठाणे-शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बससेवा सुरू असून, प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
...
२०० अत्याधुनिक व्होल्वो बसची खरेदी
राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्वो बस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच मुंबई-पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होईल.
...
प्रस्तावित मार्ग
नाशिक-पुणे
नाशिक-छत्रपती संभाजीनगर
नाशिक-जळगाव-धुळे
पुणे-कोल्हापूर
पुणे-सांगली
पुणे-सोलापूर
नागपूर-चंद्रपूर
नागपूर-अमरावती-अकोला
...
गतिमान प्रवास
नवीन २०० बसमध्ये ३० शयनयान (स्लीपर) बसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विनावातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लीपर शिवनेरी’ सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप दिले जाणार आहे.
...
आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळणार आहे. ‘शिवनेरी’चा हा विस्तार म्हणजे केवळ बससेवेची वाढ नव्हे; तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि गतिमान प्रवास संस्कृतीची नवी दिशा आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com