पल्स'' मुळे आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार
आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार
मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; २७, २८ मार्चला पल्सचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे तंत्रज्ञान येत आहे. नवनवीन संशोधन, येणारे तंत्रज्ञान, दुर्धर आजारावरील परवडणारे उपचार आणि आजारांना प्रतिबंध या सर्वांचा संगम मुंबईत आयोजित ‘पल्स’ परिषदेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पल्स या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे २७ व २८ मार्च २०२६ला करण्यात येणार आहे. पल्स २०२६चा कर्टन रेझर कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे झाला. या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मानवी आरोग्यासाठी निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांवर यशस्वी मात करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. सध्या शासन, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राने सोबत येऊन यावर उपाय काढण्याची आवश्यकता आहे. आपल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी पल्स परिषद ही मोठी संधी आहे. परिषदेकरिता जगभरातून जवळपास १३० नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक, संशोधक येणार आहेत. सध्या असलेली युद्ध परिस्थिती तोपर्यंत निवळून जाईल आणि विनासायास तज्ज्ञ परिषदेला येऊ शकतील. जर ही परिस्थिती कायम राहिली तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना परिषदेत सहभागी करून घेतले जाईल. परिषदेत २० सत्रांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील संशोधन, नवनवीन तंत्रज्ञान, परवडणाऱ्या खर्चात मिळू शकणारे उपचार, दुर्धर आजारांवरील उपचार याविषयी चर्चा होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही या परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, की मुंबईत होणारी ही परिषद आरोग्य, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध करून देणार आहे. या संधीचा उपयोग राज्यातील दुर्गम, अति दुर्गम भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार पूजा मिसाळ यांनी कार्यक्रमात सादरीकरण करीत परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमादरम्यान परिषदेवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच कार्यक्रमासाठी निर्मित संकेतस्थळाची माहिती देण्यात आली. परिषदेच्या माहितीवर आधारित साहित्याचे प्रकाशनही करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

