‘आभासी अटके’चा नवा सापळा
आभासी अटकेचा नवा सापळा
सीबीआय, ईडीच्या नावाने धमक्या; वृद्धांना घर, सोने विकायला लावून कोट्यवधी उकळले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : विविध पातळ्यांवर सुरू असलेली जनजागृती आणि भूतकाळात फसवणूक झालेल्यांचे अनुभव माध्यमांमधून ठळकपणे प्रसिद्ध होऊनही शहरात आभासी अटकेचे गुन्हे थांबलेले नाहीत. त्यातच आता सायबर भामट्यांनी एक पाऊल पुढे टाकत लक्ष्य ठरलेल्यांच्या बँकेतील जमापुंजी उकळण्यासह सोनेनाणे, स्थावर मालमत्तेवरही हात टाकण्यास सुरुवात केली आहे.
सायबर भामट्यांनी सुरुवातीला आर्थिक गैरव्यवहारात सहभाग, कोट्यवधींचा घोटाळा करून फरार झालेल्या ठगांना सहकार्य केल्याचा आरोप ठेवत वृद्धांना अटकेची भीती घालून हळूहळू दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याची, पहलगाम हल्ल्यात सहभागी अतिरेक्यांच्या संपर्कात असल्याची भीती घालण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांप्रमाणे वेशभूषा करून बोगस ओळख पत्र, सर्वोच्च न्यायालयापासून ईडी, सीबीआय अशा यंत्रणांच्या नावे बोगस नोटीस, वॉरंट पाठवून खरेच एखाद्या प्रकरणाचा गोपनीय तपास सुरू असल्याचा आभास निर्माण केला जातो. आभासी अटकेत ठेवलेल्यांकडून कुटुंबाच्या नावे असलेली बँक खाती, त्यावरील जमा रक्कम, मुदत ठेवी, शेअर बाजारातील गुंतवणुकीची इत्थंभूत माहिती घेतली जाते. आर्थिक व्यवहारांचा तपास पूर्ण होइपर्यंत ही सर्व जमापुंजी, गुंतवणूक मोडण्यास भाग पाडून भामटे ती स्वतःच्या खात्यावर घेतात. तपास पूर्ण झाला की ही सर्व रक्कम परत केली जाईल याची कागदोपत्री हमीही देतात. मात्र रक्कम वळती झाली की संपर्क तोडतात. ही आतापर्यंतची गुन्हे पद्धत होती. अलीकडच्या दोन घटनांमध्ये भामट्यांनी लक्ष्य केलेल्या नागरिकांना चक्क घर, सोनेनाणे विकण्यास, गहाण ठेवण्यास भाग पडल्याने सायबर पोलिसांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, आभासी अटकेसह सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांचेच सहकार्य अपेक्षित आहे. कायद्यात आभासी अटक हा प्रकार अस्तित्वात नाही. पोलिस व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर संपर्क साधत नाहीत. एखाद्याविरोधात गुन्हा नोंदवण्यापूर्वी पोलिस ठाण्यात बोलावून प्रत्यक्ष चौकशी करून आर्थिक व्यवहाराच्या नोंदी तपासतात. तपासासाठी बँकेतील जमापुंजी भलत्याच खात्यांवर घेत नाहीत.
याबाबत विविध पातळ्यांवर जनजागृती सुरू आहे. अशा प्रकारे कोणी संपर्क साधून पोलिस यंत्रणा, न्यायालयांच्या नावे कागदपत्रे पाठवल्यास त्याची अवघ्या काही सेकंदांत शहानिशा करता यावी, या उद्देशानेही मुंबई गुन्हे शाखेने समर्पित हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यावर ही कागदपत्रे पाठवल्यास त्याची शहानिशा अवघ्या काही सेकंदांत करून मिळते. तरीदेखील नागरिक भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत, ही चिंतेची बाब आहे.
भामट्यांनी उकळले १.८३ कोटी
- मुलुंड येथे वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला १४ ते ३१ जानेवारीदरम्यान आभासी अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी १.८३ कोटी रुपये उकळले. तक्रारदाराच्या नावे सिम कार्ड प्राप्त करून धमकीचे, आक्षेपार्ह मेसेज घाटकोपर परिसरात पाठवण्यात आले. त्याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. याशिवाय या सिम कार्ड व बँक खात्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले आहेत.
- या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या गोपनीय आदेशाद्वारे मुंबई गुन्हे शाखा, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाद्वारे (ईडी) सुरू आहे, अशी भीती घालण्यात आली. विशेष म्हणजे भामट्यांनी संपूर्ण कुटुंबीयांच्या नावे असलेली मालमता, बँकेतील जमा, ठेवी, खरेदी केलेले समभाग, सोनेनाणे असे सर्व तपशील लेखी घेतले. या कुटुंबाला मुदत ठेवी मोडण्यास, सोने विकण्यास, गहाण ठेवण्यास भाग पाडून ही रक्कम विविध खात्यांवर वळवण्यास भाग पाडले.
- खासगी कंपनीतून मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झालेल्या वयोवृद्ध दाम्पत्यास आभासी अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी घर विकण्यास भाग पाडले. घर विकून आलेली रक्कम आणि बँकेतील जमापुंजी असे एकूण १.१६ कोटी या दाम्पत्याने भामट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर वळवले. दोन कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ठेवत भामट्यांनी या दाम्पत्याला अटकेची भीती घातली होती.
पोलिसांचे आवाहन
कायद्यात आभासी अटकेची तरतूद नाही. त्यामुळे अशा प्रकारे कोणी पोलिस असल्याचे भासवून संपर्क साधला, अटकेची भीती घातली तर तातडीने तो फोन कट करावा. पुन्हा फोन आल्यास उचलू नये, नंबर ब्लॉक करावा. अन्य क्रमांकावरून संपर्काचा प्रयत्न झाल्यास पोलिस नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

