मुंबई पालिकेचे हजारो कोटी ''पाण्यात''!
मुंबई पालिकेचे हजारो कोटी ‘पाण्यात’!
मिठी नदीसह नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा बोजवारा
खर्च अवाढव्य, पण कामे अद्याप अपूर्णच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईला पावसाळ्यात तुंबण्यापासून वाचवण्यासाठी आणि शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. मात्र, इतका अवाढव्य खर्च करूनही मिठी नदीचा प्रश्न सुटलेला नाही, की इतर नद्यांचे पुनरुज्जीवन पूर्ण झाले नाही. पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या या ‘कासवगती’ कारभारामुळे मुंबईकरांच्या कराचा पैसा नक्की जातो कुठे, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मिठी नदी : ३,६०० कोटी खर्चूनही परिस्थिती ‘जैसे थे’!
मुंबईच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मिठी नदीच्या कामासाठी पालिकेने आतापर्यंत ३,६०२.७१ कोटी रुपये खर्च केले आहेत. इतकी मोठी रक्कम खर्च होऊनही मिठी नदी आजही एका ‘गलिच्छ नाल्या’सारखीच भासते. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षातही या कामासाठी आणखी २८६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये या नदीत ‘ओतले’ जात आहेत, पण पावसाळ्यात मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडून कुर्ला-साकीनाका परिसराला वेठीस धरण्याचे सत्र थांबले नाही.
नद्यांचे पुनरुज्जीवन की पैशांचे विसर्जन
मिठी व्यतिरिक्त दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पालिकेने आतापर्यंत २,०६५.३९ कोटी रुपये खर्च केले आहेत. नद्यांचे प्रदूषण रोखणे, त्यांचे रुंदीकरण करणे आणि सौंदर्यीकरण करणे ही कामे अद्याप कागदावरच जास्त दिसत आहेत. या कामांसाठी आगामी वर्षात पुन्हा ५६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खर्च दोन हजार कोटींच्या पार गेला तरी नद्यांमधील सांडपाणी आणि कचऱ्याची समस्या सुटली नाही.
उदंचन केंद्रे आणि फ्लड गेट्सचा संथ वेग
मुंबईत पावसाचे पाणी साचू नये म्हणून उदंचन केंद्रे (पंपिंग स्टेशन्स) बांधणे आणि फ्लड गेट्सची सुधारणा करणे यावर आतापर्यंत १,३५१.११ कोटी रुपये खर्च झाले आहेत. शहरात अजूनही अनेक ठिकाणी पंपिंग स्टेशन्सची कामे अर्धवट आहेत. असे असूनही पुढील वर्षासाठी पुन्हा २५० कोटी रुपयांची खिरापत वाटण्यात आली आहे.
.........
प्रकल्पाचे नाव आतापर्यंत झालेला एकूण खर्च (कोटीत) आगामी वर्षासाठी तरतूद (कोटीत) स्थिती
मिठी नदी प्रकल्प ३,६०२.७१/२८६.२५ /कामे अद्याप अपूर्ण
नद्यांचे पुनरुज्जीवन २,०६५.३९ /५६०.००/ प्रदूषण कायम
उदंचन केंद्रे व फ्लड गेट्स १,३५१.११ /२५०.००/ प्रगती संथ
एकूण खर्च ७,०१९.२१ /१,०९६.२५ कोटी
..........
पालिकेच्या या आकडेवारीवरून एक स्पष्ट होत आहे की, प्रशासन केवळ खर्चाचे डोंगर उभे करत आहे. प्रत्यक्षात जमिनीवर मात्र कामांची प्रगती निराशाजनक आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले जाते, पण हजारो कोटी खर्चूनही मुंबईकरांना गुडघाभर पाण्यातूनच चालावे लागते, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या या ‘विचित्र’ नियोजनामुळे प्रकल्पांचा खर्च वाढत चालला असून, कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठीच हा खर्च केला जात आहे का, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

