मुंबईत भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी नसबंदी केंद्रांची क्षमता वाढवा; महापौर रितू तावडे यांचे पालिका प्रशासनाला निर्देश

मुंबईत भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी नसबंदी केंद्रांची क्षमता वाढवा; महापौर रितू तावडे यांचे पालिका प्रशासनाला निर्देश

Published on

नसबंदी केंद्रांची क्षमता वाढवा
भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी महापौर तावडे यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ५ : मुंबई महानगरातील भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि श्वानदंशाच्या घटना लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने श्वान नियंत्रण व निर्बीजीकरण मोहिमेला गती द्यावी, अशी महत्त्वाची सूचना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केली आहे. नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे, नवीन प्राणी निवारा केंद्रे उभारणे आणि प्रत्येक प्रशासकीय प्रभागनिहाय स्वतंत्र श्वान पथके तैनात करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लेखी पत्र पाठवून सविस्तर उपाययोजना सुचविल्या आहेत.

‘‘मुंबईत सध्या आठ अशासकीय संस्थांमार्फत नसबंदी व लसीकरणाचे काम केले जाते, मात्र मुंबईची व्याप्ती पाहता ही यंत्रणा अपुरी ठरत आहे. श्वानांची संख्या शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ करणे आवश्यक आहे,’’ असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे. ​महापौरांनी आपल्या पत्रात काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत. सध्याच्या केंद्रांव्यतिरिक्त मुंबईच्या विविध भागांत नवीन नसबंदी केंद्रे स्थापन करावीत, जेणेकरून वार्षिक निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल. रेबीज प्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबवता येईल. मुंबईच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये श्वान पकडणारी विशेष वाहने आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ही पथके केवळ नसबंदीसाठीच नव्हे, तर आक्रमक श्वानांबाबत नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करतील. शस्त्रक्रियेनंतर श्वानांच्या पुनर्वसनासाठी आणि विशेषतः आक्रमक श्वानांच्या निरीक्षणासाठी अद्ययावत सुविधा असलेली निवारा केंद्रे विकसित करण्यात यावीत. ही योजना पहिल्या टप्प्यात सात परिमंडळांमध्ये राबवून, त्यानंतर त्याचा विस्तार सर्व २६ विभागांत करावा. तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर नियमित नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र मूल्यमापन यंत्रणा असावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.​‘‘या उपाययोजनांमुळे श्वानदंशाच्या घटना कमी होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. नागरी प्राणी व्यवस्थापन अधिक आधुनिक आणि संवेदनशील पद्धतीने राबविणे ही काळाची गरज आहे,’’ असेही महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com