म्हाडाच्या सेवा आता मोबाईलवर
डिजीम्हाडा मोबाईल ॲप्लिकेशन सुरू
म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज, वेगवेगळे शुल्क सहज भरता येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : सर्वसामान्य नागरिकांना आता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून म्हाडा संबंधीची कामे करता येणार आहेत. त्यासाठी म्हाडाने ‘डिजीम्हाडा’ हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. त्याचे लोकार्पण आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते झाले. त्यामुळे नागरिकांना घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करणे, वेगवेगळे शुल्क भरणे म्हाडाच्या सेवांचा सहज, सुलभ आणि वेगवान मार्ग खुला झाला आहे. परिणामी नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात या ॲपचे औपचारिक लोकार्पण झाले. म्हाडातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा एकाच, सुलभ आणि एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. सार्वजनिक प्रशासनात डिजिटल परिवर्तनाचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना संजीव जयस्वाल म्हणाले, नागरीकेंद्रित प्रशासन प्रस्थापित करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याने या ॲपद्वारे माहितीचा अधिकार अर्ज करण्याची सुविधादेखील ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि वेळबद्ध पद्धतीने सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
म्हाडाचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व वाढेल. तसेच ‘डिजीम्हाडा’मुळे नागरिकांची कार्यालयीन भेटींची गरज कमी होऊन वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. तसेच नागरिक आणि म्हाडा यांच्यातील संवाद अधिक सशक्त करणारे डिजिटल दुवा ठरेल, असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला. या वेळी म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदीरकर, महेश जेस्वानी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, मुंबई मंडळाचे मुख्य लेखाधिकारी मोतेस रोड्रिग्स, प्रकल्प नियोजन कक्ष प्रमुख नीलिमा धायगुडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले आदी उपस्थित होते.
माहितीचा अधिकार अंतर्गत अर्जदारांना ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲपद्वारे किती अर्जाचा निपटारा झाला याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे.
व्हॉट्सॲपद्वारे प्रश्नांची उत्तरे, फॉर्म डाऊनलोड करता येणार
नागरिकांच्या कल्याणासाठी पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सेवा वितरणातील गती वाढविण्यासाठी म्हाडाचे एक व्हॉट्सॲप खाते तयार करण्यात आले आहे. या व्हॉट्सॲप खात्यामध्ये सहभागी होण्याकरिता ९३२६२५८९११ हा भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच डिजीम्हाडा व म्हाडाच्या संकेत स्थळावर व्हॉट्सॲप आयकॉन दर्शविण्यात आला आहे. या माध्यमातूनदेखील नागरिकांना म्हाडाविषयी प्रश्नांची उत्तरे तत्काळ मिळणार आहेत. तसेच म्हाडाविषयी अर्ज/फॉर्म्स डाऊनलोड करण्याची सुविधा मिळणार आहे.
ॲपद्वारे या सेवा मिळणार
ई-बिलिंग सेवा, लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा (राइट टू सर्व्हिसेस), अधिकृत सूचना, म्हाडा अभ्यांगत प्रणाली, म्हाडाचे पूर्णत्वास आलेले प्रकल्प, सद्यस्थितीत सुरू असलेले प्रकल्प, तक्रार निवारण पोर्टल, ई लिलाव, ऑटो डीसीआर परवानगी प्रणाली, बृहतसूचिवरून सदनिका वितरणासाठी अर्ज, कंत्राटदारांची नोंदणी, म्हाडाचे ठराव, लेख व ब्लॉग ,समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठ आदी सेवा नागरिकांना ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

