गोरेगाव-मुलुंड लिंक रोड: जुळ्या बोगद्याचे काम वेगात; १० मार्चपासून ''टीबीएम'' मशिन उतरवण्यास सुरुवात

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड: जुळ्या बोगद्याचे काम वेगात; १० मार्चपासून ''टीबीएम'' मशिन उतरवण्यास सुरुवात

Published on

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, जुळ्या बोगद्याचे काम वेगात
१० मार्चपासून ‘टीबीएम’ मशीन उतरवण्यास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ६ : मुंबईकरांचा पूर्व-पश्चिम प्रवास वेगवान करणाऱ्या ‘गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता’ (जीएमएलआर) प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे काम पूर्ण झाले आहे. १० मार्चपासून प्रत्यक्ष बोगदा खनन संयंत्र शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

​मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी गुरुवारी प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी कामाचा वेग वाढवून ३१ मेपर्यंत रत्‍नागिरी जंक्शन येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश दिले. ​बोगदा खोदण्यासाठी दोन अत्याधुनिक टीबीएम मशीनचा वापर केला जाणार आहे. शाफ्टच्या तळाशी २० मीटर लांब आणि २.५ मीटर जाडीचा वक्र काँक्रीट साचा तयार झाला आहे. त्याचे क्युरिंग सुरू आहे. हे अजस्त्र मशीन खाली उतरवण्यासाठी ८०० मेट्रिक टन आणि ३५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेन वापरल्या जाणार आहेत. ८०० टनी क्रेनचे सुटे भाग दाखल झाले असून, ७ मार्चपर्यंत ती कार्यान्वित होईल. ८ मार्चला या क्रेनची भार चाचणी घेतली जाईल. १० मार्चपासून टीबीएमचे ‘मेन शिल्ड’, ‘कटर हेड’ आणि ‘मेन बेअरिंग’ यांसारखे मुख्य भाग शाफ्टमध्ये उतरवून त्यांची जुळवाजुळव सुरू होईल.

प्रवास सुरक्षित होईल
​रत्नागिरी जंक्शन येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करताना बांगर यांनी कडक सूचना दिल्या. पियर कॅपचे काम अंतिम टप्प्यात असून, गिरडर लॉन्चिंगचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ‘‘पावसाळ्यापूर्वी, म्हणजेच ३१ मे २०२६ पर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला पाहिजे. यासाठी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवा,’’ असे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. ‘‘येत्या जून महिन्यापासून बोगदा खोदकामाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ होईल.’’ असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी सांगितले. ​या पाहणी दौऱ्यावेळी उपआयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, कार्यकारी अभियंता नरेश मेघराजानी आणि अन्य तांत्रिक सल्लागार उपस्थित होते.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com