

Prithviraj Chavan on corporate control over Indian media
sakal
मुंबई : आजच्या स्थितीत माध्यमांवर कोणत्या ना कोणत्या कॉर्पोरेटचे वर्चस्व असल्याने आवश्यक स्वातंत्र्य मिळू शकत नाही. माध्यमांवरील कॉर्पोरेटचे नियंत्रण कमी व्हायला हवे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना ते बोलत होते.
या वेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, आज अंबानी, अदाणी, सुभाषचंद्र यांच्याकडे किती चॅनेल्स आहेत, याचा अभ्यास केला, तर त्यांचा आवाका किती मोठा आहे, हे लक्षात येईल. मीडियावरील हा कॉर्पोरेट कंट्रोल कमी झाला पाहिजे. त्यावर काही मर्यादा आल्या पाहिजेत. तसेच मीडियाच्या विविध भागात केवळ एका कॉर्पोरेट हाउसने प्रवेश करावा का, यावरही मर्यादा असाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.