महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेचे प्रमाण वाढतयं
जागतिक महिला दिन
-----
महिलांमध्ये वाढतेय लोहाची कमतरता
वेळीच उपचार न केल्याने ॲनिमियाचा धोका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : कौटुंबिक आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशक्तपणा, डोकेदुखी आणि सतत थकवा यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. दर महिन्याला ३० ते ४५ वयोगटातील साधारण १० पैकी पाच महिला या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे उपचारासाठी येतात. या समस्या प्रामुख्याने शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. वेळेत उपचार न झाल्यास पुढे अॅनिमिया होण्याचा धोका वाढू शकतो, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी लोहाच्या कमतरतेकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. साध्या रक्त तपासण्यांद्वारे ही समस्या लवकर ओळखता येते. हिमोग्लोबिन टेस्ट, सिरम फेरिटिन टेस्ट आणि कम्प्लीट ब्लड काउंट या तपासण्या शरीरातील लोहाचे प्रमाण समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. लोहाच्या कमतरतेची सामान्य लक्षणे म्हणजे थकवा, अशक्तपणा, त्वचा फिकट दिसणे, चक्कर येणे, धाप लागणे, डोकेदुखी आणि केस गळणे. त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यान होणारा अधिक रक्तस्राव. तसेच गर्भधारणा, अयोग्य आहार, वेळेवर जेवण न करणे आणि हिरव्या भाज्या व कडधान्यांचे कमी सेवन यामुळेही लोहाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
----
महिलांमध्ये लोहाची कमतरता ही गंभीर बाब आहे. थकवा आणि अशक्तपणा ही लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात; परंतु हिमोग्लोबिन, सिरम फेरिटिन आणि सीबीसी रक्त तपासण्यांमुळे शरीरातील लोहाचे प्रमाण सहज कळू शकते आणि अॅनिमियाचा धोका वेळेत ओळखता येतो.
- डॉ. उपासना गर्ग, वैद्यकीय तज्ज्ञ
----
लोह हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा खनिज घटक आहे. त्यातूनच हिमोग्लोबिन तयार होऊन शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवले जाते. शरीरात लोह कमी झाल्यास निरोगी लाल रक्तपेशी तयार होत नाहीत आणि अॅनिमिया होऊ शकतो.
- डॉ. ऋतू अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

