

जागतिक महिला दिन विशेष
-----
‘गॅस’ समजून हृदयविकाराकडे दुर्लक्ष
५० ते ६० वयोगटात अधिक प्रमाण; शीव रुग्णालयाचे निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : हृदयविकाराची लक्षणे ही सामान्यतः गॅस, थकवा किंवा अस्वस्थता समजून त्याकडे दुर्लक्ष केल्याने मागील दोन वर्षांत महिलांमधील हृदयविकाराच्या प्रकरणांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. यामध्ये विशेषतः ५० ते ६० वयोगटातील महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाच्या अभ्यासातून मांडण्यात आले.
मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढता तणाव हे हृदयविकाराचे प्रमुख कारण ठरत आहेत. श्वास लागणे, असामान्य थकवा, अॅसिडिटी, घाम येणे, जबडा किंवा पाठदुखी अशी लक्षणे दुर्लक्षित करणे जीवघेणे ठरू शकते, अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याचे अभ्यासात नमूद केले आहे. जोखमीच्या कारणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, तंबाखूचे सेवन आणि ताण हे प्रमुख घटक असल्याचे निदर्शनास आले. मागील वर्षात तणावाचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. बदलती जीवनशैली, प्रदूषण, धूम्रपान, अनियमित दिनचर्या आणि वाढता ताण यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढत आहे. त्यामुळे महिलांनी असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून घेणे अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
----
हृदयविकारावरील उपचार
वर्ष पुरुष महिला
२०२३ १,७५० ७४२
२०२४ २,००० ८६०
२०२५ १,९९८ ८८४
----
महिलांमध्ये हृदयविकाराची कारणे अनेकदा वेगळी आणि अस्पष्ट असतात. छातीत तीव्र वेदना न होता अॅसिडिटी, थकवा, पाठदुखी, जबड्यात वेदना किंवा मळमळ अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेक महिला ही लक्षणे किरकोळ समजून दुर्लक्ष करतात आणि उपचारात उशीर होतो.
- डॉ. प्रताप नाथानी, विभागप्रमुख, हृदयरोग
अधिक चांगल्या तपासणी सुविधा आणि सरकारी आरोग्य विमा योजनांमुळे आता जास्त रुग्णांची तपासणी होत आहे. त्यामुळेही हृदयविकाराची प्रकरणे अधिक प्रमाणात नोंदवली जात आहेत.
- डॉ. चरण लांजेवार, हृदयरोगतज्ज्ञ, केईएम रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.