पुरवणी मागण्यांमध्ये सरकारने एसटीसाठी अतिरिक्त निधीचा विचार करावा
एसटीसाठी अतिरिक्त निधी हवा
सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये विचार करावा
मुंबई, ता ७ : राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (एसटी) काही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे; मात्र तोट्यातील एसटीसाठी ती अपुरी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी ही तरतूद ‘थोडी खुशी, थोडा गम’ असून पुरवणी मागण्यांमध्ये तरी सरकारने एसटीसाठी अतिरिक्त निधीचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, की एसटी हे राज्यातील गरीब आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असताना सरकारला त्याचा विसर पडल्याचे दिसते. तसेच प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि एसटी सक्षम करण्यासाठी भविष्यात ८,३०० नव्या बसगाड्या खरेदी करण्याचा संकल्प परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे; मात्र त्यासाठी आणि इतर विकासकामांसाठी किमान ८,००० कोटी रुपयांची गरज असताना अर्थसंकल्पात केवळ २,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे बरगे यांनी नमूद केले. यंदाच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळाच्या सवलत मूल्य प्रतिपूर्तीसाठी सुमारे तीन हजार ६७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे दिसते. या तरतुदीतून कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा प्रश्न काही प्रमाणात पूर्ण सुटला नाही तरी काही प्रमाणात सुटू शकतो, ही बाब निश्चितच दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
देणी प्रलंबित
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युइटीसारख्या रकमा अद्याप संबंधित ट्रस्टकडे जमा करण्यात आलेल्या नाहीत. तसेच वाढीव महागाई भत्तादेखील कर्मचाऱ्यांना देण्यात आला नाही. एकूण सुमारे ४,५०० कोटी रुपयांची वैधानिक देणी प्रलंबित असल्याने एसटीला भरीव आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, असे बरगे यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर किमान पुरवणी मागण्यांमध्ये तरी सरकारने एसटीसाठी अतिरिक्त निधीचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

