राज्यकर उपायुक्तासह तिघांविरोधात गुन्हा
राज्य कर उपायुक्तासह तिघांविरोधात गुन्हा
२० लाखांची लाच घेताना एसीबीची नाशिकमध्ये कारवाई
मुंबई, ता. ७ ः नाशिक येथील राज्य कर उपायुक्तासह तिघांना एका प्रकरणात सव्वा कोटींची लाच मागून त्यातील २० लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. नाशिकच्या पाथर्डी फाटा, प्रशांतनगर येथील वस्तू व सेवाकर कार्यालयात एसीबीच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली.
एसीबी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य कर उपआयुक्त सोमनाथ दत्तू पागे (४७), सहाय्यक आयुक्त मछिंद्र विठ्ठल दोंदे (५५) आणि खासगी व्यक्ती अमित हिरामण जाधव (३६) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून ताब्यात घेण्यात आले. तसेच तिघांच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकण्यात आले.
या प्रकरणातील तक्रारदाराचे नाशिकच्या दामोदर चौकात कार्यालय आहे. येथे सुरू असलेली करविषयक कारवाई, तपास लवकर पूर्ण करण्यासाठी उपआयुक्त पागे, सहाय्यक आयुक्त दोंदे यांनी सव्वा कोटींची लाच मागितली होती. यासंदर्भात १ मार्चला तक्रारदाराने एसीबीच्या मुंबई येथील मुख्यालयात धाव घेतली. त्याआधारे ४ मार्चला एसीबीने पडताळणी केली. तेव्हा पागे, दोंदे यांनी तडजोडीअंती एक कोटी लाच स्वीकारण्याचे कबूल केले. तक्रारीत तथ्य आढळल्याने ६ मार्चला एसीबीने नाशिक येथील उपायुक्तांच्या कार्यालयात सापळा रचला. त्यात पागे, दोंदे यांच्या वतीने २० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना खासगी व्यक्ती जाधव यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याची चौकशी आणि पडताळणी कारवाईआधारे एसीबी पथकाने पागे, दोंदे यांनाही ताब्यात घेतले.
कार्यालयात दोन लाखांची रोकड
कारवाईनंतर आरोपी शासकीय अधिकाऱ्यांची अंगझडती, कार्यालय आणि शासकीय वाहनाची झाडाझडती घेण्यात आली. त्यात पागे यांच्या कार्यालयात दोन लाखांची बेहिशेबी रोकड सापडली, ती जप्त करण्यात आली. या तिघांची घरझडती शनिवारी घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

