भररस्त्यात कर्तव्यावरील पोलिस महिलेस शिवीगाळ, धमकी
भररस्त्यात महिला पोलिसाला शिवीगाळ
महिलेचे कृत्य; पोलिसांकडून मात्र अदखलपात्र गुन्हा
मुंबई, ता. ७ ः अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा सुरू असताना मरीन ड्राइव्ह परिसरात रहदारीस अडथळा होईल, अशा रीतीने उभी असलेली कार बाजूला घेण्याची सूचना पोलिसांनी केली. या वेळी संबंधित पोलिस महिलेस अर्वाच्च शिवीगाळ ऐकून घ्यावी लागली. इतकेच नव्हे तर चारचौघात कपडे फाटेपर्यंत मारीन, ही धमकीही निमूटपणे झेलावी लागली. ही शिवीगाळ चक्क एका महिलेनेच केली. याबाबत मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी वाहतूक पोलिस दलातील महिला पोलिस शिपायासोबत हा प्रसंग घडला. मारहाणीसोबत आपण एका बड्या राजकीय पुढाऱ्याची नातेवाईक असून तुझ्या बापालाच फोन लावते, अशी धमकी दिली. या प्रसंगाचा व्हिडिओ शनिवारी सर्वत्र व्हायरल झाला. दरम्यान, वर्दीचा मान आणि वाहतूक नियमांचे कर्तव्याला प्राधान्य देत या पोलिस महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले; मात्र कर्तव्य आटोपल्यावर पोलिस महिलेने मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी शिवीगाळ करणाऱ्या महिलेविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद दाखल केल्याची माहिती पोलिस उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. शिवीगाळ करणाऱ्या महिलेचे मानसिक संतुलन ढासळले असून मनोविकारतज्ज्ञांकडे तिच्यावर उपचार सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले. या महिलेच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले असून पुढील कारवाई प्रस्तावित असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
पोलिस दलात नाराजी
भररस्त्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला अशाप्रकारे धमकावणाऱ्या महिलेविरोधात शासकीय कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्यास मारहाणीची धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंदवणे अपेक्षित होते; मात्र मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवल्याबद्दल पोलिस दलात नाराजीचे वातावरण आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी महिलेचे मानसिक संतुलन ढासळल्याचे भासत नाही. शिवाय, सोबत असलेल्या नातेवाइकांनीही या महिलेस आवरण्याचा विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाही, अशी चर्चा पोलिस दलात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

