३० मिनिटांत उपचार नाही तर होणार कारवाई
३० मिनिटांत उपचार नाही तर होणार कारवाई
महापालिकेच्या रुग्णालयांसाठी आपत्कालीन नियमावली लागू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : रुग्णांना ताटकळत ठेवणे, उपचार न देता दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने पालिकेच्या रुग्णालयांसाठी नवीन आपत्कालीन नियमावली नुकतीच लागू करण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार, आपत्कालीन विभागात आलेल्या रुग्णाची ३० मिनिटांच्या आत तपासणी व उपचार सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमावलीचे पालन न झाल्यास संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे, की कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला स्थिर न करता दुसऱ्या रुग्णालयात पाठवता येणार नाही. रुग्णांची उपेक्षा झाल्याच्या सतत येणाऱ्या अहवालांनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उपचारांना उशीर होऊ नये, हाच यामागचा उद्देश असून सर्वाधिक आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांसाठी हा नवा नियम असेल. पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक व माध्यमिक आरोग्य सेवा विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पवार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आपत्कालीन विभागासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार आपत्कालीन विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील. त्यानंतर संबंधित रजिस्ट्रार किंवा पदव्युत्तर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी रुग्णाची स्थिती तपासतील. या नियमांनुसार ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रुग्णाला प्रतीक्षेत ठेवता येणार नाही. तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय उपचार करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
गंभीर त्रुटी समोर
गेल्या काही महिन्यांत पालिका रुग्णालयांमधील काही गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या. काही प्रकरणांमध्ये सीटीस्कॅन मशीन बंद असणे किंवा तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसणे, यामुळे रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले होते. फेब्रुवारीमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ६२ वर्षीय महिलेचा बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातून डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात हलविण्याचा प्रकारही घडला होता.
रुग्णाची स्थिती स्थिर करणे आवश्यक
नव्या नियमावलीनुसार ‘एमएलसी’ प्रकरणांमध्ये रुग्णाचे नाव, वय, पत्ता, एमएलसी क्रमांक आणि त्याला रुग्णालयात आणणाऱ्या व्यक्तीची माहिती नोंदवहीत नोंदवणे अनिवार्य असेल. गंभीर रुग्णांना तपासणीसाठी पाठवण्यापूर्वी त्यांची स्थिती स्थिर करणे आणि तातडीने उपचार सुरू करणेही आवश्यक आहे. तसेच रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यापूर्वी त्याची रुग्ण म्हणून नोंद, प्राथमिक उपचार आणि सविस्तर ट्रान्स्फर नोट तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांचे स्थलांतर ऑक्सिजन व आवश्यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिकेतूनच केले जाईल आणि त्यासोबत डॉक्टर किंवा रजिस्ट्रार असणेही अनिवार्य असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

