''उजेडाच्या वाटेवर'' स्त्री शक्तीचे दर्शन; रवींद्र नाट्य मंदिरात छायाचित्र प्रदर्शन आणि महिला कला महोत्सवाचा जागर
‘उजेडाच्या वाटेवर’ स्त्रीशक्तीचे दर्शन; रवींद्र नाट्यमंदिरात छायाचित्र प्रदर्शन आणि महिला कला महोत्सवाचा जागर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिर संकुलात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित ‘महिला कला महोत्सव २०२६’ सध्या मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. बुधवार (ता. ४)पासून सुरू झालेल्या या महोत्सवात ‘उजेडाच्या वाटेवर - महिला सक्षमीकरणाचे दर्शन’ हे विशेष छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले असून, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.
ज्येष्ठ छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी टिपलेल्या या छायाचित्रांमधून राज्याच्या विविध भागांतील, वेगवेगळ्या वयोगटांतील आणि सामाजिक परिस्थितीतील स्त्रियांच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास उलगडण्यात आला आहे. स्त्रियांच्या स्थितीगतीचे दर्शन घडवणारे हे केवळ प्रदर्शन नसून, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुदृढ करणारा एक प्रयत्न आहे, अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार वर्षा कुलकर्णी यांनी या प्रदर्शनाचे शब्दांकन केले आहे. हे प्रदर्शन रविवार (ता. ८)पर्यंत सर्वांसाठी खुले होते.
महोत्सवांतर्गत संगीत, नाटक, नृत्य आणि चर्चासत्रांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित ‘आनंदमठ’ हे संगीत नाटक आणि अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत पार पडली. ८० वर्षांत आठ हजार वडाची झाडे लावणाऱ्या पद्मश्री सातुमरदा चिम्मक्का यांना नृत्यातून श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘एक तिची गोष्ट’ हे नृत्य-संगीत नाटक, महिला संगीतकारांच्या गाण्यांची मैफल ‘ती’चे सूर आणि ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांच्या पुस्तकावर आधारित ‘मुक्ता’ हे मुक्तनाट्य सादर झाले. रात्री ‘मी कात टाकली’ या लावणी कार्यक्रमाने रंगत आणली. पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई सावे-राऊत यांच्या जीवनावरील ‘दि हिंदू लेडी’ हे नाटक आणि आदिवासी स्त्रियांच्या जगण्यावर आधारित ‘आदिम गीतकथा’ हे दृकश्राव्य सादरीकरणही झाले.
याप्रसंगी बोलताना आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, की जेव्हा एखादी महिला आयोगाकडे तक्रार घेऊन येते तेव्हा ती केवळ एक कागद घेऊन येत नसून त्यात तिची वेदना असते. महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण व्हावे, यासाठी आयोग खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. महोत्सवाच्या ठिकाणी महिलांसाठी विनामूल्य ‘ऑन द स्पॉट’ व्यंगचित्र रेखाटन आणि फूट मसाजची सोयदेखील करण्यात आली आहे, ज्याला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

