आरोग्य बजेटच्या तरतुदीत घट
आरोग्य बजेटच्या तरतुदीत घट
महागाईमुळे वाढ पुरेशी नसल्याची तज्ज्ञांकडून टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारच्या एकूण खर्चात फक्त १.८ टक्के वाढ झाली आहे; पण देशात सुमारे पाच टक्के महागाई असल्यामुळे ही वाढ पुरेशी नाही, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्राच्या उत्पन्नात १४ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे. तरीही राज्य सरकारला अर्थव्यवस्थेतून जास्त महसूल मिळवता आलेला दिसत नाही. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील खर्च कमी झाल्याचे जन स्वास्थ्य अभियानचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रवी दुग्गल यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सामाजिक क्षेत्रासाठी २,८९,६७१ कोटी रुपये तरतूद होती. यंदा ती २,६८,४६० कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच सुमारे ७.३ टक्क्यांची घट झाली आहे. ही गोष्ट सामान्य नागरिकांसाठी चांगली नाही, असे ते म्हणाले. एकूणच पाहता, यंदाच्या अर्थसंकल्पामुळे आरोग्य क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे दिसते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे आणि सर्वसामान्यांना आरोग्य सेवा अधिक उपलब्ध करून देणे कठीण होऊ शकते, असे डॉ. दुग्गल यांनी सांगितले.
काही योजनांमध्येही निधी कमी करण्यात आला आहे ः
‘लाडकी बहीण’ योजना : ३०,६१९ कोटींवरून २१,००० कोटी (३१% घट)
पोषण कार्यक्रम : ५,८५१ कोटींवरून ३,१९९ कोटी (४५% घट)
ग्रामीण विकास : ३५,८१५ कोटींवरून ३४,०१० कोटी (५% घट)
आरोग्य क्षेत्रातही निधी कमी झाला आहे. मागील वर्षी ३८,४५५ कोटी रुपये होते, तर यंदा ३३,६५४ कोटी रुपये ठेवले आहेत. म्हणजेच सुमारे १२.५ टक्के घट झाली आहे.
आरोग्य क्षेत्रातील काही घटकांमध्येही कपात झाली आहे ः
शहरी आरोग्य : १०,९४६ कोटींवरून ७,९२२ कोटी (२७% घट)
ग्रामीण आरोग्य : २,६३७ कोटींवरून १,४३१ कोटी (४४% घट)
राष्ट्रीय आरोग्य अभियान : ४,८९० कोटींवरून ३,४१९ कोटी (३०% घट)
सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम : १२,०६६ कोटींवरून १०,६९७ कोटी (११% घट)
वैद्यकीय शिक्षण : १०,८७२ कोटींवरून ९,९६८ कोटी (८.३% घट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

