भायखळा कारागृहात ''जागतिक महिला दिन'' उत्साहात; १९० महिला बंद्यांना नामांकित शेफ अमृता रायचंद यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप
भायखळा कारागृहात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात
१९० महिला बंद्यांना शेफ अमृता रायचंद यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज मुंबई जिल्हा महिला कारागृह आणि भायखळा जिल्हा कारागृहात महिला अधिकारी, कर्मचारी आणि महिला बंद्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ या ब्रीदवाक्याला अनुसरत कारागृहातील महिला बंद्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवण्यात आलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमाचा समारोप या वेळी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. कारागृह अधीक्षक विकास रजनलवार यांनी उपस्थित महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. कारागृहासारख्या आव्हानात्मक ठिकाणी सेवा बजावणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत त्यांनी महिलाशक्तीचा गौरव केला.
कारागृहातील महिला बंद्यांच्या पुनर्वसनासाठी ‘फन क्लब फाउंडेशन’ आणि ‘टाटा स्ट्राइव्ह’ यांच्या सहकार्याने ‘फूड अँड बेवरेज स्टीवोर्ड’ हे विशेष प्रशिक्षण राबवण्यात आले होते. पाककला आणि सेवा क्षेत्रातील या प्रशिक्षणाच्या एकूण चार बॅचेस पूर्ण झाल्या. एकूण १९० महिला बंद्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. आज महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईतील नामांकित शेफ अमृता रायचंद यांच्या हस्ते या प्रशिक्षित महिला बंद्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर या महिलांना हॉटेल व्यवसायात सन्मानाने रोजगार मिळवणे शक्य होणार आहे.
या सोहळ्याला वरिष्ठ तुरुंगाधिकारी संतोषी कोळेकर, तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) अमृता दशवंत, भगवान मंचरे यांच्यासह कारागृहातील इतर महिला व पुरुष अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारागृह प्रशासनाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व महिला कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

