मुंबईचा कायापालट होणार; महापौर रितू तावडे यांचा ''१०० दिवसांचा मास्टर प्लॅन'' जाहीर!
मुंबईचा कायापालट होणार
महापौर रितू तावडे यांचा ‘१०० दिवसांचा मास्टर प्लॅन’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आपला ‘१०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा’ जाहीर केला आहे. ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर, अवघ्या एका महिन्यात महापौरांनी सात महत्त्वाच्या उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करून प्रशासनाला गती दिली आहे.
महिला दिनानिमित्त बोलताना महापौर म्हणाल्या, की मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करणे हे आमचे लक्ष्य आहे. या आराखड्यात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणि ‘लाडक्या बहिणीं’साठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे. पालिका शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे आणि संविधानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणे, सर्व रस्ते दर्जेदार सिमेंट काँक्रीटचे करणे आणि स्टॅम्प्ड काँक्रीटचे पदपथ बनवणे, वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करणे आणि मोकळ्या जागांचे रक्षण करणे, ‘मेयर जेन नेक्स्ट’ इंटर्नशिप प्रोग्रामची सुरुवात, मराठी चित्रपटांसाठी खास मल्टिप्लेक्सची सोय करणे, हे त्यांच्या आराखड्यातील इतर प्रमुख कामे आहेत. ‘भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सुरक्षित मुंबई’ हे आमचे ब्रीद आहे. या २१ कलमी आराखड्यामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि जनसामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला आहे.
.....
महत्त्वाचे सात उपक्रम
१. पारदर्शक कारभार : पालिकेची सर्व खरेदी आता पोर्टलमार्फत होणार
२. स्वच्छता मोहीम : समुदाय स्तरावर स्वच्छता स्पर्धा आणि कचरामुक्त वॉर्डांचे नियोजन
३. नालेसफाई व ब्रिमस्टोवॅड २ : पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई आणि पाणी तुंबण्याच्या समस्येवर आयआयटी मुंबईच्या मदतीने उपाययोजना
४. फेरीवाला पुनर्वसन : पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोडसह ओळखपत्र आणि नियोजित हॉकिंग झोनची निर्मिती
५. आरोग्य सुविधा : पालिकेच्या रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यावर भर
६. प्रवेशद्वार उभारणी : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान भव्य प्रवेशद्वार उभारणे
७. राणीची बाग : आशियाई सिंहांच्या जोडीसाठी गुजरात सरकारकडे यशस्वी पाठपुरावा
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

