गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राज्यात एचपीव्ही लसीकरण मोहीम; ९.८४ लाख मुलींना संरक्षणाचे लक्ष्य
राज्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला प्रारंभ
गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी मुलींना संरक्षण कवच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षणासाठी राज्यभरात १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आला. या मोहिमेत राज्यातील नऊ लाख ८४ हजार ४१४ मुलींना लस देण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले असून, पुढील तीन महिन्यांत हे लसीकरण पूर्ण करण्याचा मानस आहे.
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महिला अनेकदा कुटुंब आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. गर्भाशयमुख कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे या आजाराला निश्चित आळा बसेल. या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण महत्त्वाचे आहे. पुढील तीन महिने ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून, सर्व पालकांनी १४-१५ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. त्यांनी समाजमाध्यमांवर पसरविल्या जाणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करून योग्य माहिती स्वीकारण्याचेही आवाहन केले.
दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या आरोग्याकडे समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि योग्य समुपदेशन करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पत्रकार, स्त्रीरोग तज्ज्ञ, परिचारिका आणि आरोग्य सेविकांचा या वेळी सन्मानही करण्यात आला.
महिलांच्या आरोग्यासाठी केंद्र व राज्य सरकार ठामपणे उभे आहेत. योग्य वयात एचपीव्ही लसीकरण झाल्यास गर्भाशयमुख कर्करोगापासून महाराष्ट्र निश्चित मुक्त होऊ शकतो.
- मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

