एलपीजी दरवाढीने गृहिणींची कोंडी

एलपीजी दरवाढीने गृहिणींची कोंडी

Published on

एलपीजी दरवाढीने गृहिणींची कोंडी
युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; सर्वसामान्यांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पूर्व आशियात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे गडद सावट आता थेट सर्वसामान्यांच्या ताटावर पडू लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे इंधन कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची मोठी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले असून, ऐन महिलादिनी झालेल्या या दरवाढीमुळे सामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. याचा फटका भारतालाही बसत असून, तेल कंपन्यांनीच गॅसचे नवीन दर लागू केले आहेत. आता गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा ६० रुपये जादा मोजावे लागत आहेत. सिलिंडर ८५३ वरून आता ९१३ रुपयांवर केला आहे. त्यात वस्ती पातळीवर आणि सोसायटीत जागेवर पोहोच करण्यासाठी जादा २० ते ३० रुपये द्यावे लागत आहे. त्याचा फटका ही सामान्यांना सहन करावा लागत आहे.
शहरात फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चूल पेटविता येत नाही, तर वस्त्यांमध्येही धुरामुळे आपले व शेजारच्याचेही घर खराब होण्याच्या भीतीने चूल पेटविता येत नाही.

युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या दरात वाढ झाली. आधीच जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. त्यात आता घरगुती गॅस सिलिंडर दरात वाढ झाल्याने सामान्यांना याची झळ बसत आहे. याचा सरकारने विचार करायला हवा.
- नम्रता गवळे, गृहिणी

गृहिणी एक एक रुपया वाचवून संसार करत असतात. ८५३ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ९१३ च्या वर गेला आहे. घर कसे चालवायचे, असा प्रश्न गृहिणींसमोर उभा आहे. सध्या मध्यमवर्गीय लोकांसमोर जगायचं कसं, हा प्रश्न आहे. त्यात प्रत्येक बाबतीत दरवाढ करत असाल, तर कसे चालेल.
- आश्विनी भोसले, गृहिणी

गॅस महागल्याने महागाई वाढण्याची शक्यता असून, अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंच्या किमतीतही वाढ होऊ शकते. व्यावसायिक क्षेत्रात उत्पादन खर्च वाढल्यामुळे नोकऱ्या आणि व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. भविष्यात युद्ध संपले तरी पुरवठा साखळी पूर्ववत होण्यास वेळ लागेल. सरकारने सबसिडी किंवा इतर मदत द्यावी.
- आरती आंग्रे, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com