

गोरेगावमध्ये महापालिकेचा हातोडा
एस. व्ही. रोडवरील १३ अनधिकृत दुकानांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : गोरेगाव (पश्चिम) परिसरातील पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागाने मंगळवारी (ता. १०) मोठी मोहीम राबवली. या कारवाईत स्वामी विवेकानंद (एस. व्ही.) मार्ग आणि ५डी रस्त्यावरील एकूण १३ अनधिकृत दुकाने व त्यांच्या वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आले.
स्वामी विवेकानंद मार्ग आणि ५डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. या तक्रारींची दखल घेत उपायुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली. एस. व्ही. रोड येथील तीन पूर्णतः अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली, तर ५डी रोडवरील १० दुकानांनी केलेले अनधिकृत वाढीव बांधकाम निष्कासित करण्यात आले. या मोहिमेदरम्यान परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करून रस्ते मोकळे करण्यात आले.
‘पी दक्षिण’ विभागाच्या परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन आणि अनुज्ञापन विभागातील पाच अधिकारी व २५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. कारवाईसाठी एक जेसीबी, एक ट्रक आणि गॅस कटर यांसारख्या आधुनिक संयंत्रांचा वापर करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बांगुरनगर पोलिस ठाण्याकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापुढेही अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात अशाच प्रकारे नियमितपणे मोहीम सुरू राहील, असा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.