

मुंबई विद्यापीठाचा ब्रिस्टल विद्यापीठासोबत सामंजस्य करार
मुंबई, ता. १० : उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठासोबत व्यापक शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून शैक्षणिक, संशोधन तसेच अध्यापन आणि संशोधकांच्या देवाणघेवाणीला चालना देण्याबरोबरच विविध संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या कराराअंतर्गत भूगोल, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, नॅनोसायन्स व नॅनोतंत्रज्ञान, हवामान बदल तसेच शाश्वतता अध्ययन या क्षेत्रांमध्ये शैक्षणिक आणि वैज्ञानिक सहकार्य वाढविण्यावर दोन्ही विद्यापीठांनी भर दिला आहे. संयुक्त संशोधन प्रकल्प, कार्यशाळा, परिषद, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी सह पदवी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. ब्रिस्टल विद्यापीठाने मुंबईमध्ये आपला कॅम्पस सुरू केल्यामुळे या सहकार्याला आणखी बळ मिळणार असून, दोन्ही संस्थांदरम्यान दीर्घकालीन शैक्षणिक संबंध प्रस्थापित होणार आहेत. नुकत्याच गोवा येथे झालेल्या या सामंजस्य करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि ब्रिस्टल विद्यापीठाच्या प्रो-व्हाइस चान्सलर (ग्लोबल एंगेजमेंट) प्रा. मिशेल अच्युटो यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठ आणि ब्रिस्टल विद्यापीठ यांच्यातील हा करार विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण व संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
परदेशी विद्यापीठांसोबत सहकार्य
नवी मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या एज्यु-सिटी प्रकल्पाअंतर्गत परदेशी विद्यापीठांसोबत शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य वाढविण्याच्या दिशेने विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहेत. याच अनुषंगाने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत सागरी अध्ययन, सागरी संशोधन तसेच स्पोर्टस् सायन्सच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सहकार्यामुळे समुद्र विज्ञान, किनारी परिसंस्था, सागरी संसाधनांचे व्यवस्थापन तसेच क्रीडा विज्ञानाच्या आधुनिक पद्धतींचा अभ्यास आणि संशोधनाला चालना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.