मुंबईत चहाची ‘काटकसर’; स्पेशल चहा बंद, फक्त ‘कटिंग’वर भर!

मुंबईत चहाची ‘काटकसर’; स्पेशल चहा बंद, फक्त ‘कटिंग’वर भर!
Published on

मुंबईत चहाची ‘काटकसर’
स्पेशल चहा बंद, फक्त ‘कटिंग’वर भर; गॅसटंचाईवर उपाय

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १० : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला व्यावसायिक गॅसचा तुटवडा आता मुंबईच्या कोपऱ्या कोपऱ्यावरील चहाच्या टपऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. गॅस सिलिंडर मिळणे कठीण झाल्यामुळे चहा व्यावसायिकांनी आपला गॅस वाचवण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ‘स्पेशल चहा’ देणे बंद करण्यात आले असून, केवळ गॅसची बचत व्हावी म्हणून ‘कटिंग चहा’ देण्यावर भर दिला जात आहे.

​साधारणतः एका मध्यम आकाराच्या चहाच्या दुकानाला दोन दिवसांसाठी किमान एक व्यावसायिक सिलिंडर लागतो. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सिलिंडर्सचे बुकिंगच बंद आहे. ज्या डीलर्सना व्यावसायिक थेट संपर्क साधत आहेत, त्यांच्याकडूनही ‘‘पुढचे काही दिवस गॅस मिळणार नाही,’’ असे उत्तर मिळत आहे. यामुळे व्यावसायिकांची मोठी ‘पंचायत’ झाली आहे.
​गॅस लवकर संपू नये म्हणून चहाविक्रेत्यांनी आपल्या ‘मेनू’मध्ये मोठे बदल केले आहेत. ​अद्रक चहा, उकाला आणि ब्लॅक टी हे प्रकार तयार करण्यासाठी जास्त वेळ गॅस सुरू ठेवावा लागतो. त्यामुळे हे प्रकार सध्या बंद केले आहेत. ​जो चहा मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवलेला असतो, फक्त तोच चहा ग्राहकांना दिला जात आहे.
​एका कपात वेगळा मसाला किंवा अद्रक टाकून उकळवला जाणारा ‘स्पेशल चहा’ सध्या टाळला जात आहे.

तातडीने तोडगा काढा
​मुंबईतील सीएसएमटी आणि इतर वर्दळीच्या ठिकाणच्या दुकानांमध्ये दिवसाला चार ते पाच हजार चहाची विक्री होते. अशा ठिकाणी पाच ते सहा कामगार रात्रंदिवस काम करतात.​ ‘‘आम्हाला चहा बनवण्यासाठी जो सिलिंडर लागतो, त्याच गॅसवर या कामगारांचे जेवणही बनते. आता सिलिंडरच मिळेनासा झाल्याने आम्ही गॅस वाचवण्याची मोहीम आखली आहे. कामगारांचे जेवण वेळेवर व्हावे आणि व्यवसायही थोडाफार सुरू राहावा, यासाठी आम्ही सध्या स्पेशल चहा देणे बंद केले आहे.’’ असे जनता की हाऊसचे मालक नरेश पाटील यांनी सांगितले. मुंबईचा श्वास असलेला चहा आता गॅसच्या संकटामुळे ‘कडू’ होऊ लागला असून, सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी छोटे व्यावसायिक करत आहेत.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com