गोरेगाव–मुलुंड प्रकल्पाने गाठला महत्त्वाचा टप्पा
गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाने गाठला महत्त्वाचा टप्पा
जुळ्या बोगद्यांसाठी टीबीएमचे सुटे भाग शाफ्टमध्ये उतरवण्यास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पश्चिम आणि पूर्व उपनगरांना वेगवान जोडणी देणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाने आज एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ओलांडला. या प्रकल्पातील जुळ्या बोगद्यांच्या खोदकामासाठी लागणाऱ्या महाकाय बोगदा खनन संयंत्राचे सुटे भाग शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया आज (ता. ११) अधिकृतरीत्या सुरू झाली.
विशेष म्हणजे, नियोजित वेळापत्रकाच्या तीन महिने आधीच हे काम सुरू झाल्याने प्रकल्पाच्या वेगाबाबत समाधान व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज चित्रनगरीतील कार्यस्थळाला भेट देऊन या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या प्रकल्पासाठी ‘टेराटेक’ कंपनीने तयार केलेली प्रत्येकी २,१७५ मेट्रिक टन वजनाची एस-११८ आणि एस-११९ ही दोन यंत्रे वापरली जाणार आहेत. १४.४९ मीटर व्यास असलेली ही मुंबईतील आजवरची सर्वात मोठी यंत्रे आहेत. आज ८०० आणि ३५० मेट्रिक टन क्षमतेच्या अवाढव्य क्रेनच्या साहाय्याने १३५ मेट्रिक टन वजनाचे ‘टाईप ए शिल्ड’ (खनन करणारा मुख्य भाग) सुरक्षितपणे २०० मीटर लांब आणि ३० मीटर खोल शाफ्टमध्ये उतरवण्यात आले.
प्रकल्पाची एकूण लांबी १२.२० किलोमीटर (गोरेगाव चित्रनगरी ते मुलुंड खिंडीपाडा) इतकी आहे. त्याला प्रत्येकी ४.७० किलोमीटर लांबीचे समांतर बोगदे आहेत. महत्त्वाचे म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगररांगांखाली हे बोगदे पूर्णपणे जमिनीखालून जाणार असल्याने निसर्गाला हानी पोहोचणार नाही. बोगद्यात ३-३ मार्गिका, प्रगत वायुवीजन (व्हेंटिलेशन) यंत्रणा आणि अग्निशमन व्यवस्था असेल.
चित्रनगरी परिसरात यासाठी २०० मीटर लांब आणि ५० मीटर रुंद लॉन्चिंग शाफ्ट तयार करण्यात आला आहे. या शाफ्टमध्ये टीबीएम यंत्राचे कटर हेड, मेन बेअरिंग, स्क्रू कन्वेयर यांसारख्या सुट्या भागांची जुळवाजुळव करून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होईल. खोदकाम पूर्ण झाल्यावर ही यंत्रे मुलुंडच्या अमरनगर येथील पुन:प्रापण कूपमधून बाहेर काढली जातील.
या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, उपआयुक्त गिरीश निकम, प्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह पालिका अभियंते आणि तांत्रिक सल्लागार उपस्थित होते.
कामाची वैशिष्ट्ये
- विक्रमी वेळ : नियोजित वेळेच्या ९० दिवस आधीच कामाला सुरुवात
- प्रचंड वजन : टीबीएम यंत्राचे वजन २,१७५ मेट्रिक टन (दोन यंत्रे)
- सुरक्षितता : ८०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे भागांची चढ-उतार
- संपर्क व्यवस्था : पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

