

बिश्नोई टोळीच्या नावाने चुलत्यालाच धमक्या
पाच कोटींच्या खंडणीसाठी व्हॉट्सॲप कॉल; पुतण्या दिल्लीतून अटकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः कुख्यात लॉरेंस बिश्नोई आणि त्याच्या टोळीच्या नावे पश्चिम उपनगरातील व्यावसायिकास तब्बल पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या तरुणास मालाड पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. कैलास अग्रवाल असे आरोपीचे नाव असून, तो तक्रारदार व्यावसायिकाचा पुतण्या आहे.
तक्रारदाराचे नाव बाबुलाल अग्रवाल (६२) असे असून, ते मालाड येथे वास्तव्यास आहेत. बाबुलाल पेशाने शेअर ब्रोकर आहेत. गेल्या महिन्यात २ ते २४ तारखेदरम्यान त्यांना बिश्नोई टोळीच्या नावे पाच कोटींच्या खंडणीसाठी धमक्या प्राप्त झाल्या. या धमक्या अमेरिका, स्पेन आदी देशांतील सिम कार्डवरून येत होत्या. व्हॉट्सअँप कॉल, व्हॉइस नोटद्वारे बिश्नोई टोळीचे नाव घेत खंडणी न दिल्यास तुझ्यासह कुटुंबाला ठार मारू, असे बजावण्यात येत होते.
बाबुलाल यांनी धीर ठेवत पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू करताच धमक्या थांबल्या. मात्र, पुन्हा २ मार्च रोजी बाबुलाल यांना धमक्या सुरू झाल्या. यावेळेस युकेतील सिम कार्ड वापरण्यात आले होते.
मालाड पोलिसांकडून सुरू असलेल्या तांत्रिक तपासाला या नव्या धमकीच्या कॉलमुळे यश आले. हे कॉल परदेशी सिम कार्ड वापरून दिल्ली, नोएडा येथून येत असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिस पथक दिल्लीला रवाना झाले. अखेर गुरुग्राम येथील नेमका पत्ता मिळवून पथकाने कैलास यास अटक केली. झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने बिश्नोई टोळीचे नाव वापरून चुलत्यालाच लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.