मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागातर्फे मेत्ता ध्यान कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागातर्फे मेत्ता ध्यान कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
Published on

मेत्ता ध्यान कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
मानसिक स्वास्थ्य व एकाग्रतेसाठी बुद्ध वचनांचा आधार

मुंबई, ता. १२ : विद्यार्थ्यांमध्ये मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागातर्फे ६ ते ८ मार्च या कालावधीत विशेष तीनदिवसीय मेत्ता ध्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पाली विभागाचा हा महत्त्वपूर्ण वार्षिक उपक्रम असून, यंदा या मालिकेतील सहावी कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या प्रशिक्षणात एकूण ८६ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ध्यान साधनेचा लाभ घेतला. सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडलेल्या या कार्यशाळेत अमेरिकेतील प्रख्यात ध्यान मार्गदर्शक डेल्सन आर्मस्ट्राँग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मेत्ता ध्यान थेट ‘बुद्ध वचनां’मधून, म्हणजेच भगवान बुद्धांच्या मूळ शिकवणीतून शिकविण्यात आले. ‘मेत्ता सुत्ता’सारख्या पाली सुत्तांचे वाचन करून विद्यार्थ्यांना बुद्धांच्या शिकवणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. मुंबई विद्यापीठाचा पाली विभाग पाली भाषेच्या अध्ययनासोबतच भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी विविध शैक्षणिक व प्रात्यक्षिक उपक्रम राबवत आहे. पाली ही बुद्धांच्या उपदेशांची मूळ भाषा असल्यामुळे या प्राचीन भारतीय भाषेच्या माध्यमातून भारतीय ज्ञान परंपरा (आयकेएस) जपणे, तिचे संशोधन करणे आणि ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे यावर विभाग विशेष भर देत आहे. तसेच विद्यार्थ्यांना बुद्धांचे तत्त्वज्ञान समजून घेण्यास आणि विपश्यना साधनेद्वारे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास प्रोत्साहित केले जाते.
या कार्यशाळेत ‘ट्रॅन्क्विल विज्डम इन्साइट मेडिटेशन’ (टीडब्ल्यूआयएम) या ध्यान पद्धतीची ओळख करून देण्यात आली. मेत्ता (प्रेमभाव) आणि विपश्यना (अंतर्दृष्टी) यांचा समन्वय असलेल्या या पद्धतीत ‘फोर आरएस रेकग्नाइझ, रिलॅक्स, री-स्माइल आणि रिटर्न’ या तंत्राच्या माध्यमातून मनातील ताण कमी करून शांत, स्थिर आणि संतुलित मन कसे विकसित करावे याचे प्रात्यक्षिक, मार्गदर्शन करण्यात आले.
पाली विभागप्रमुख डॉ. योजना भगत यांनी गुरुजींच्या मार्गदर्शनाचा आशय विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगत पाली सुत्तांच्या आधारे बुद्धांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट केले. विभागात ‘विपस्सना भावना एज सीन इन पाली लिटरेचर’ या विषयावरील एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम राबविला जात असून, विभागातील बहुतांश विद्यार्थी नियमित ध्यानसाधना करतात. सातत्यपूर्ण सरावासाठी विद्यार्थी दर रविवारी एकत्रित ध्यानसाधना करतात तसेच अनेक विद्यार्थी १० दिवसांच्या सखोल विपश्यना अभ्यासक्रमात सहभागी होतात. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक लक्ष्मण सोनावणे आणि शिक्षकेतर कर्मचारी रुपेश गमरे आणि जयेश जवादे यांनी विशेष परिश्रम घेतले. विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढविण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com