कूपर रुग्णालयात स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा

कूपर रुग्णालयात स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा

Published on

कूपर रुग्णालयात स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा
तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे उपमहापौर संजय घाडी यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालयात सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच रुग्णालय परिसरात कचरा टाकणे किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश उपमहापौर संजय घाडी यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. यासाठी परिसरात प्रभावी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.
उपमहापौर घाडी यांनी बुधवारी (ता. ११) कूपर रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. या वेळी त्यांनी अपघात विभाग, अतिदक्षता विभाग (आयसीयू) तसेच बालरुग्ण विभागाला भेट देत वैद्यकीय सुविधा व स्वच्छतेची स्थिती जाणून घेतली. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधून उपचार सेवांबाबत माहिती घेतली. या पाहणीवेळी नगरसेवक दीपक कोतेकर, अनिष मकवाना, सुधा सिंह तसेच कूपर रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. देव शेट्टी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
कूपर रुग्णालयावर उपनगरांतील रुग्णांचा मोठा ताण असल्याचे सांगत घाडी यांनी येथे सुपरस्पेशालिटी सुविधा विकसित करण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे महत्त्वाचे असून रुग्णालयातील रिक्त पदांचा अनुशेष लवकर भरून काढण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे घाडी यांनी स्पष्ट केले. तंबाखूजन्य पदार्थ रुग्णालयात आणण्यास बंदी घालण्यासाठी प्रवेशद्वारावर कडक तपासणी करावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणेही आवश्यक असून त्यासाठी परिसरात स्वच्छतेचे नियम दर्शविणारे फलक लावण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com