किडनीसाठी हजारोंची प्रतीक्षा

किडनीसाठी हजारोंची प्रतीक्षा
Published on

किडनीसाठी हजारोंची प्रतीक्षा
प्रत्यारोपण मर्यादित; अवयवदानाची गरज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना प्रत्यक्ष होणाऱ्या प्रत्यारोपणांची संख्या मात्र त्याच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे चित्र समोर येत आहे. मुंबईत सध्या सुमारे साडेचार ते पाच हजार रुग्ण किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षायादीत आहेत; मात्र उपलब्ध दाते आणि प्रत्यक्ष होणाऱ्या प्रत्यारोपणांची संख्या मर्यादित असल्याने अनेक रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही दरी कमी करण्यासाठी अवयवदानाबाबत समाजात व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक किडनी दिनानिमित्ताने मूत्रपिंड दान आणि प्रत्यारोपणातील ही तफावत पुन्हा अधोरेखित झाली आहे.
गेल्या काही वर्षांत अवयवदानाबाबत जागरूकता वाढत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत असले, तसेच वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे प्रत्यारोपणांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तरीदेखील प्रत्यारोपणासाठीची वाढती मागणी आणि उपलब्ध किडनी दान यामधील दरी अजूनही मोठीच आहे.
२०१२ नंतर मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली.
२०१७-२०२१ या कालावधीत सर्वाधिक ३७६ प्रत्यारोपण झाले; मात्र प्रतीक्षा यादीतील रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अद्याप अपुरीच आहे.

मूत्रपिंड दान वाढले, तरीही अपुरेच
२०१० नंतर मूत्रपिंड प्रत्यारोपणांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ दिसून येऊ लागली. २०१६ मध्ये ९१ तर २०१९ मध्ये सर्वाधिक १२३ मूत्रपिंड प्रत्यारोपण नोंदवले गेले; मात्र कोविड-१९ महामारीच्या काळात या प्रक्रियेला मोठा फटका बसला. २०२० मध्ये प्रत्यारोपणांची संख्या ४६ पर्यंत घसरली. त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारत गेल्यानंतर पुन्हा संख्येत वाढ होत २०२४ मध्ये ९३ प्रत्यारोपण झाले. २०२५ मध्ये ८२ प्रत्यारोपण नोंदवले गेले असून २०२६ मध्ये २० फेब्रुवारीपर्यंत २० मूत्रपिंड प्रत्यारोपण पार पडले आहेत.

भारतात किडनी प्रत्यारोपणासाठीची मागणी आणि उपलब्ध किडनी यामध्ये मोठी दरी आहे. देशातील सुमारे १५ टक्के प्रौढांना गंभीर मूत्रपिंड विकार असल्याचा अंदाज आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ. मयूरी त्रिवेदी,
विभागप्रमुख, मूत्रपिंड विकार, सायन रुग्णालय

मुंबईतील किडनी प्रतीक्षा यादी पाहिल्यास सुमारे साडेचार ते पाच हजार रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या तुलनेत प्रत्यारोपणाची संख्या अत्यंत कमी आहे. गेल्या दोन वर्षांत किडनीदानामध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी मागणी आणि दान यामधील दरी अजूनही मोठी आहे.
- डॉ. गीता सेठी, विभागप्रमुख, मूत्रपिंड विकार, जेजे रुग्णालय

कालावधी प्रत्यारोपण संख्या
१९९७-२००१ ४४
२००२-२००६ ९४
२००७-२०११ १०६
२०१२-२०१६ ३०६
२०१७-२०२१ ३७६
२०२२-२०२५ ३२०
२०२६ (२० फेब्रुवारीपर्यंत) २० एकूण : १,२७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com