एकाच यकृतातून दोन रुग्णांना नवे आयुष्य

एकाच यकृतातून दोन रुग्णांना नवे आयुष्य

Published on

एकाच यकृतातून दोन रुग्णांना नवे आयुष्य
परळ येथील खासगी रुग्‍णालयात शस्त्रक्रिया यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : एका दात्याच्या यकृतातून दोन रुग्णांना नवे आयुष्य देणारी अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची ‘स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट’ शस्त्रक्रिया परळ येथील खासगी रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडली. ३८ वर्षीय मेंदूमृत दात्याचे यकृत दोन भागांत विभागून ४४ वर्षीय पुरुष रुग्ण आणि तीन वर्षांच्या बालरुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे दोन्ही कुटुंबांना नव्या आयुष्याची आशा मिळाली आहे.
सायन येथील नेतोजी चव्हाण (४४) हे दीर्घकाळापासून ‘एंड-स्टेज लिव्हर डिसीज’ने त्रस्त होते. पोटात पाणी साचणे, कावीळ आणि स्नायू कमजोर होणे, अशा गंभीर लक्षणांमुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. १ एप्रिल २०२१ पासून ते यकृत दात्याच्या प्रतीक्षेत होते.
दरम्यान, नेरूळ येथील तीनवर्षीय चार्विक इंगळे हा ‘क्रिप्टोजेनिक सिरोसिस’ या दुर्मिळ यकृतविकाराने ग्रस्त होता. या आजारामुळे त्याची वाढ खुंटली होती तसेच पोटात द्रव साचल्याने शरीरावर मोठ्या प्रमाणात सूज येत होती. सीटी स्कॅनद्वारे निदान झाल्यानंतर १२ डिसेंबर २०२५ पासून त्याचे नाव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत नोंदवण्यात आले होते. त्याच्यासाठी यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव उपचार पर्याय होता.
डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात ३८ वर्षीय व्यक्तीला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्या रुग्णालयात केवळ किडनी प्रत्यारोपणाची सुविधा असल्याने झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यकृताची स्थिती चांगली असल्यामुळे तज्ज्ञांनी ‘स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट’ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अनुराग श्रीमल यांनी दिली.
९ फेब्रुवारी २०२५ रोजी दात्याचे यकृत दोन भागांत विभागण्यात आले. त्यातील मोठा ‘राइट ट्रायसेक्शन’ भाग प्रौढ रुग्णासाठी, तर लहान ‘लेफ्ट लेटरल सेगमेंट’ हा बालरुग्णासाठी वापरण्यात आला.
ही अत्यंत गुंतागुंतीची प्रत्यारोपण प्रक्रिया तब्बल १५ ते १७ तास चालली. तज्ज्ञ शल्यचिकित्सक, अ‍ॅनेस्थेशिया तज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर टीम यांच्या समन्वयामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ते लवकरच नियमित आयुष्य जगू शकतील.
झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर यांनी सांगितले की, बालरुग्णांसाठी योग्य आकाराचे यकृत मिळणे अनेकदा कठीण ठरते. अशा वेळी ‘स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट’ तंत्रामुळे एका दात्याच्या यकृतातून दोन रुग्णांना जीवदान देता येते. भारतात ही पद्धत अद्याप क्वचितच वापरली जाते. डॉ. बिपिन चेवले यांनी अवयवदात्याच्या कुटुंबाच्या निःस्वार्थ निर्णयामुळे एकाच वेळी दोन रुग्णांना नवजीवन मिळाल्याचे सांगितले. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com