रेल्वे वेळेच्या शर्यतीत भुसावळ विभाग अव्वल
वेळेच्या शर्यतीत भुसावळ विभाग अव्वल
मध्य रेल्वेचा देशात प्रथम क्रमांक; चार दिवस १०० टक्के वक्तशीरपणाचा विक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः वेळेच्या अचूकतेत सातत्यपूर्ण कामगिरी करत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने भारतीय रेल्वेतील ६९ विभागांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. शुक्रवारी (ता. १३) १७३ गाड्या वेळेवर धावल्याने विभागाने १०० टक्के वक्तशीरपणा नोंदवत नवा इतिहास रचला.
त्या दिवशी भुसावळ विभागाने सुमारे ५४,०६७ किलोमीटरचे नियोजित अंतर आणि ५४,०७४ मिनिटांचा वेळेचा आराखडा अचूक पाळला. एकात्मिक कोचिंग व्यवस्थापन प्रणाली (आयसीएमएस)मध्ये नोंद असलेल्या १७३ पैकी सर्व गाड्या वेळेवर धावल्याने हा विक्रम शक्य झाला. दुसऱ्या क्रमांकावरील जोधपूर विभागाच्या तुलनेत ही कामगिरी दुप्पट असून हुबळी, राजकोट आणि भावनगर विभागांच्या एकत्रित गाड्यांपेक्षाही अधिक आहे. भुसावळ विभागाच्या इतिहासात प्रथमच १०० टक्के वक्तशीरपणाची नोंद झाली आहे. बुधवारी (ता. ११) ९८.३२ टक्क्यांचा पूर्वीचा विक्रम यामुळे मागे पडला आहे. या कामगिरीमुळे देशातील १७ रेल्वे झोनमध्ये मध्य रेल्वेला पाचव्या स्थानावर पोहोचण्यात भुसावळ विभागाचा मोठा वाटा राहिला आहे.
मार्च महिन्यात ३, ५, ११ आणि १३ या चार दिवसांत विभागाने १०० टक्के वक्तशीरपणा साध्य केला आहे. दररोज सरासरी १७० हून अधिक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे नियोजन करताना मोठ्या प्रमाणातील वाहतूक हाताळणे आव्हानात्मक असते. तरीही नियंत्रकांनी गाड्यांवर बारकाईने लक्ष ठेवत प्रभावी समन्वय साधल्याने ही कामगिरी शक्य झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
वक्तशीरपणावर भर
मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य देणे तसेच वक्तशीरपणाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या धोरणामुळेच हा यशस्वी परिणाम मिळाल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. सध्या मध्य रेल्वेचा एकूण वक्तशीरपणा ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. प्रवाशांना अधिक विश्वासार्ह आणि वेळेवर सेवा देण्यासाठी मध्य रेल्वे कटिबद्ध असून परिचालन कार्यक्षमतेवर सातत्याने भर दिला जाणार असल्याचेही प्रशासनाने नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

