आरटीओ कारवाईवर कॅमेऱ्याची नजर

आरटीओ कारवाईवर कॅमेऱ्याची नजर

Published on

आरटीओ कारवाईवर कॅमेऱ्याची नजर
वाहनचालकांसोबतचे वाद रेकॉर्ड; दोन महिन्यांत ६०० कॅमेरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : वाहनचालक कारवाई टाळण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांशी वाद घालतात. मात्र, आता असे प्रकार झाल्यास ते वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरू शकते. आरटीओ अधिकाऱ्यांना बॉडी वाॅर्न कॅमेरे देण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला असल्याने वाद घालणाऱ्या वाहनचालकांचे संपूर्ण संभाषण रेकॉर्ड होणार आहे. प्रसंगी वाहनचालकांना तुरुंगवारीही होऊ शकते. पुढील दोन महिन्यांत ६०० कॅमेरे येणार आहेत.
आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर अनेकदा वाहनचालक हे आरटीओ अधिकाऱ्यांसोबत वाद घालून अधिकाऱ्यांवर दबाव आणत कारवाई टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे प्रयत्न यापुढे वाहनचालकांच्या अंगलट येणार आहेत. वाहकांनी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत साधलेले सर्व संभाषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार आहे. तेच अधिकाऱ्यांकडील सबळ पुरावा ठरणार आहे.
बरेचदा वाहनचालक आणि अधिकाऱ्यांमध्ये कारवाईवरून वादाचे प्रसंग उद्भवतात. कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांकडून दबाव टाकला जातो. आपल्याला ओळखत नाही का किंवा मोठ्या व्यक्तीला फोन करण्याची धमकी अनेकदा वाहनचालक आरटीओ अधिकाऱ्यांना देतात. त्यावरही अधिकारी मानले नाही, तर त्यांच्याशी वाहनचालक वाद घालतात.

वाद कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार
आता हा सर्व वाद कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार आहे. त्यामुळे अधिकारी पुरावा म्हणून आपल्याकडे ठेवू शकतील. वाहनचालकांवर दंडासह आता पुराव्याच्या आधारे प्रसंगी तुरुंगातसुद्धा जावे लागू शकते. त्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांशी वाद घालणे आता चांगलेच महागात पडू शकते.

Marathi News Esakal
www.esakal.com