

मुंबईकरांची तहान आता ‘रिसायकल’ पाण्यावर
सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी देण्याची पालिकेची योजना
मुंबई, ता. १५ : भविष्यातील पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते थेट पिण्यायोग्य बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासोबतच हा उपक्रम राबवला जाणार असून, पहिल्या टप्प्यात कुलाबा येथून दररोज सुमारे एक कोटी २० लाख लिटर शुद्ध पाणी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.
मुंबईत सध्या सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्याचे काम सुरू आहे. कुलाबा येथील केंद्रात दररोज ३७ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यापैकी १२ दशलक्ष लिटर (१.२० कोटी लिटर) पाण्यावर तृतीय स्तरावरील अत्याधुनिक प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य दर्जाचे केले जाणार आहे.
हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असल्याने पालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे. सल्लागाराकडून अत्याधुनिक प्रक्रिया पद्धती, पाण्याच्या विविध स्तरांवरील शुद्धतेच्या चाचण्या आणि शुद्ध पाणी मुख्य जलवाहिनीद्वारे शहराला पुरवण्याचे नियोजन याबाबत सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. या कामासाठी पालिकेने ३० कोटी रुपयांची तरतूद केली असून, अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी भांडुप संकुलातील जल बोगद्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. उपकांच्या (शाफ्ट) उत्खननाचे काम सुरू असून, ते मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जानेवारी २०२७ पासून जल बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने ५२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मुंबईची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता केवळ धरणांवर अवलंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवण्याचा हा जागतिक स्तरावरील प्रयोग मुंबईत राबवला जात असून, भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी तो महत्त्वाचा ठरणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.